Breaking News

पूल दुर्घटनेचा अहवाल तातडीने द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश; जबाबदारी निश्‍चित करणार


मुंबई / प्रतिनिधीः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेसंबंधी 24 तासात अहवाल द्या असा आदेश महापालिका आयुक्त अजेय मेहता यांनी दिला आहे. दक्षता विभागाला हा आदेश देण्यात आला आहे. मेहता यांनी ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावले आहे. याआधी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्‍चित करा असा आदेश मेहता यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.


मेहता यांनी मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना पूल दुर्घटनेची चौकशी करत 24 तासांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये दुर्घटनेसाठी जबाबदार महापालिका कर्मचार्‍यांची ओळख पटवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटरची भूमिका काय होती, याचीही पाहणी करण्यास सांगितले आहे. याशिवाय पूल दुर्घटनेची कारणे, पुलाची देखभाल परिस्थिती आणि स्ट्रक्चरल ऑडिट याचीही अहवालात माहिती मागवण्यात आली आहे. फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, की ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना आहे. रुग्णालयात 10 जण दाखल असून एक रुग्ण आयसीयूत आहे; मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच; पण याशिवाय घटनेला प्राथमिक जबाबदार कोण आहे? याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल, तर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतो असे म्हटले. ऑडिट करताना ज्यांनी हिरवा कंदील दाखवला असेल, त्यांच्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे, त्यांची पुनर्तपसाणी करावी लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.