Breaking News

करंजी-दहेगाव रस्त्यामुळे प्रवाशांचे जीवन धोक्यात


कोपरगाव/ प्रतिनिधी

रस्त्यावर पसरलेली डांबरमिश्रित खडी, ठिकठिकाणी झालेले मोठे खड्डे, उखडलेल्या साईडपट्ट्या यामुळे करंजी-दहेगाव रस्त्याची दुसरदशा झाली असून असा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.

याबाबतीत वारंवार मागणी, तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील पूर्व भागाला खराब रस्त्यांची कीड लागलेली आहे. या आधी पढेगाव - शिंगणापूर रस्त्याचे साडेपाच कोटी खर्च करुन रस्त्याचे काम झाले. परंतु अल्पावधीतच तो रस्ता 'जैसे थे' झाला. त्यावर आता पॅच देण्याचे काम झाले. तदनंतर करंजी - दहेगाव रस्त्याच्या कामाला बांधकाम विभागाने सुरवात केली. बरेच दिवस ढिगारे रस्त्याच्या बाजूला पडून राहिल्यानंतर २ अपघात त्याठिकाणी झाल्यांनतर एक वर्षांपूर्वी सुरुवात केली. डांबरमिश्रित खडी रस्त्यावर पसरून बारा महीने उलटले तरी पक्के काम झाले नाही. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघात, मनकेदुखी यांसारखे विकार वाढीस लागले आहेत. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार कळवूनही त्यावर कसलीही कार्यवाही न झाल्याने सा.बा.आणि संबंधित ठेकेदारांवर नागरीकांमध्ये तीव्र रोष आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंत्यांशी संपर्क साधला तर ते लवकरच काम केले जाईल असे उत्तर देऊन प्रश्न विचारणाऱ्यांचे निव्वळ समाधान करतात. या रस्त्याच्या कडेला साईड पट्टा घेतलेला नसून केवळ खडीच्या कडेला फुटभर वरचेवर रस्त्यावरच मातीमिश्रीत मुरुम टाकण्यात आला आहे. तशी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई नाही झाली.

त्यामुळे हा विभाग ठेकेदारांकडून खिसे भरण्यात दंग असल्याचा संशय नागरिक घेत असून हे काम तात्काळ सुरु नाही झाले तर नागरिक आंदोलन छेडण्याचा पवित्र्यात आहेत.

मातीमिश्रीत मुरुमाचे बील नाही

करंजी ते लौकी पर्यंतचे काम करत असलेल्या ठेकेदारांची दोन-तिन कामे सुरु असल्यामुळे या कामात दिरंगाई झाली. काम मार्चअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे . मातीमिश्रीत मुरुमाचे बील ठेकेदाराला देण्यात येणार नाही.

- प्रशांत वाघचौरे(सहा.अभियंता, सा.बां.कोपरगाव)

.. अन्यथा ग्रामपंचायत कार्यवाही करेल

वर्षभरापासून या रस्त्यावरील खडीला डांबर मिळेना. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नाही. आठ दिवसांच्या कालावधीत काम सुरु न झाल्यास ग्रामपंचायत या रस्त्यावर मुरुम टाकेल. त्याचे बिल ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल.

- प्रकाश शिंदे (सरपंच, पढेगाव)