Breaking News

अभिनेत्री जयाप्रदाचा भाजपत प्रवेश


नवी दिल्ली : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली असतानाच सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान जयाप्रदा यांना उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित अश्या रामपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

भाजप प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करताना जयाप्रदा म्हणाल्या की, एक राष्ट्रवादी पक्षात कार्य करण्याची संधी मिळाल्या बद्दल मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते आणि प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कार्य करायला मी फार उत्सुक आहे. यावेळी भाजप नेते भूपेंद्र यादव आणि माध्यम प्रमुख अनिल बलुनी यावेळी उपस्थित होते. 

जयाप्रदा यशस्वी नटी असून हिंदी आणि अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांत त्यांनी अभिनय केलाय. त्यासोबतच अनेक नामाकिंत पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. त्यांच्या राजकीय प्रवाशाची सुरवात 1994 साली आंध्र प्रदेशचे माजी मुख्यामंत्री एन. टी. रामा राव यांच्या तेलगू देसम पक्षातून झाली. मात्र, एनटीआरचे राजकीय उत्तराधिकारी चंद्राबाबू नायडूंसोबत मतभेत झाल्यामुळे त्यांनी टीडीपीला सोडचिट्टी दिली होती. त्यानंतर 2004 आणि 2009 साली त्या समाजवादी पार्टीच्या तिकिटावरून लोकसभेवर निवडून गेल्यात. परंतु, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांसोबतच्या प्रदीर्घ संघर्षांमुळे त्यांनी 2014 साली अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि बिजनोर येथून लोक सभा निवडणूक लढवली मात्र भाजपच्या कुंवर भारतेंद्र समोर त्यांना पराभव पत्करावा लागला होता.


चौकट..............
रामपूरमधून लढणार निवडणूक ?
जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून रामपूरचे सपा उमेदवार आजम खान यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जयाप्रदा या रामपूरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी रामपूर मतदारसंघातून सपाकडून 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत यशही मिळवले होते.
जयाप्रदा यांनी 1994 मध्ये तेलगू देसम पार्टीतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेलुगू देशम पार्टीचे संस्थापक एन टी रामाराव यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, जयाप्रदा यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्या तेलगू देशम पार्टीतून बाहेर पडल्या होत्या.