Breaking News

निधी न दिल्याने नागरीकांचा निवडणूकीवर बहिष्काराचा निर्णय


जामखेड ता/प्रतिनीधी
तालुक्यातील पिंपरखेड ते कवडगांव रस्ता आणि विचरणा नदीवरील पुलांचे काम हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. परंतु या रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे पिंपरखेड व कवडगाव रोड लगत राहणार्‍या वस्तीवर नागरिकांनी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या मागनीचे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले आहे.

पिंपरखेड कवडगांव रोड लगत राहणार्‍या वस्तीवरील लोक संख्या जवळपास 400 ते 500 असून पिंपरखेडहुन या वस्तीवर शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना येण्यासाठी विचरणा नदी असून या नदीला पाऊसाळ्यात पुर येतो. त्यामुळे वस्तीवरील नागरीकांना व शाळेत जाणार्‍या मुलांना व आजारी रुग्णाला पिंपरखेड अथवा कवडगांवाला जाता येत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला नाही. अखेर सर्व वस्तीवरील नागरिकांनी तहसीलदार यांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहिद्दीन हुसेन शेख, ढवळे प्रदीपकुमार, पाठक मारुती, अलकाबाई आबासाहेब कदम, मनीष ज्ञानेश्‍वर कदम, म्हस्के नागेश, रफिक सय्यद यांच्यासह वस्तीवरील जवळपास शंभर ते दिडशे लोकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

पिंपरखेड ते कवडगांव रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोर नेटवर्कमध्ये एम,आर,एल-09.क्रमांकाने समाविष्ट असून या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला नाही त्यामुळे सर्व वस्तीवरील नागरिकांनी येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.