Breaking News

जिल्ह्यात महाशिवरात्री मोठ्या भक्तीभावाने साजरी


सातारा,  (प्रतिनिधी) : हर हर महादेव च्या जयघोषात संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी व ठिकठिकाणच्या प्रसिध्द शिवमंदिरांमध्ये आज महाशिवरात्री मोेठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. शहरातील शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मंदिरात रात्री 12 वाजल्यापासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. याशिवाय शहरातील राजेश्वर महादेव, शहरालगतचे कुरणेश्वर महादेव मंदिर, संगम माहुली, मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिर, व्यंकटपुरा पेठेतील बहुलेश्वर मंदिर, चिमणपुर्‍यातील नरहरेश्वर मंदिर, बुधवार पेठेतील ऐतिहासिक शिवमंदिर, बॉंम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिरांत आदी शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

खेड : येथील संगममाहुली येथे शिवभक्त मित्र मंडळ संगम माहुली यांच्यामार्फत खिचडी व शिवसंध्या या भक्तीभाव गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन संगममाहुली येथे शिवभक्त मित्र मंडळ संगम माहुली यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे खिचडी वाटपाबरोबर राजगिर्‍याचे लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले. या प्रसाद ग्रहणाच्या लाभ हजारो भाविकांनी घेतला, सोबतच शिवसंध्या या भक्तिभाव सुगम संगिताचा कार्यक्रम संगम माहुली येथील शिवमंदीर परिसरात करण्यात आला. शिवस्मृती कार्यक्रमाचे मुख्य कलाकार विवेक घाडगे व इतर कलाकारांनीही सुगम संगीताच्या कार्यक्रमाची साथ दिली. झालेल्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिवभक्त मित्र मंडळ व रवी पुजारी यांनी केले.

अंगापूर : सातारा तालुक्यातील पाटेश्र्वर येथे आज महाशिवरात्री मोठ्या उत्सवात शांततेत संपन्न झाली. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे रात्रंदिवस भजन सुरू होते. तसेच पहाटेपासून डोंगराचा परिसर भाविकांनी गजबजला होता.

सातारा शहरापासून अंदाजे 12 कि.मी. आहे. हे शिवमंदिर डोंगरावर पुरातन काळातील असून त्याचे बांधकाम कोरीव दगडामध्ये आहे. डोगरावर येताना प्रथम श्रीगणेशाचे दर्शन घेतले जाते. तेथून एक किलोमीटर अंतरावर शिवमंदिर आहे. पूर्वी हा परिसर दंडकारण्याचा होता. येथे ऋषी मुनींचे वास्तव होते. माणसाचा देव बनविण्याची शाळाही येथे होती, अशी अख्यायिका सांगितली जाते.

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी मंदीर परीसरात व रस्त्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. सातारा व ग्रामीण पंचक्रोशीतून याठिकाणी येणारे भाविक व लहान मुलांकरिता अनेक ठिकानी प्रसाद, फराळ व खेळण्यांची दुकाने लागली होती. बेल फुल वाले भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात दुकाने थाटून बसले होते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले देवालय व मंदिर परिसरात अल्हाददायी वातावरणाचा आनंद भाविक घेत तासंतास या परिसरात रममान होताना दिसत होते.

दरम्यान, सातार्‍यातील प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातही दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. आज सकाळी 6 वाजता लघुन्यास, एकादश रुद्र जप, लघुरुद्र होत व पुर्णाहूती महामंगल आरती, कलशयात्रा, श्री मुलनाथेश्र्वर पिंडीस कलशाभिषेक करण्यात आला.तसेच महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपयर्ंंत मंदीर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

कालपासून मंदिरात महाशिवरात्री निमित्त सुरु असलेल्या लघुरुद्राची हवनाद्वारे पूर्णाहूती दुपारी संपन्न झाली. मंदिराचे व्यवस्थापकिय विश्र्वस्त रमेश शानभाग व सौ. उषा शानभाग यांचे हस्ते पूर्णाहूती करण्यात आली. त्याचे पौरोहित्य वेदमूर्ति दत्तातशास्त्री जोशी यांनी केले. तसेच या धार्मीक कार्यक्रमात हवनासाठी सातारा येथील वेदमुर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी, अनिरूध्द उमासे, यज्ञेश्र्वरशास्त्री जोशी, हरीरामशास्त्री जोशी, हणमंत बोरीकर, चंद्रमौळेश्र्वर शास्त्री जोशी, संकेत पुजारीख, सुशांत शेवडे, रोहित जोशी, आदित्य कुलकर्णी, श्रेयस भिसे हे ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.

याचवेळी मंदिरात स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या गुरू स्व.साधनाताई जोशी यांच्या शिष्यांनी शास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये यश कोल्हापूरे याने तोडीरागात बडाख्याल, छोटा ख्याल व तराणा सादर केला. सौ.उषा शानभाग यांनी भैरव रागात बडाख्याल, छोटाख्यात सादर केला. सौ उज्ज्वला नानल यांनी मधूमाद सारंग आणि सौ.शुभदा लाटकर यांनी अहिरभैरव राग सादर केला. हवन आणि गायनाचे वेळी अनेक मान्यवर चित्रकारांनी मंदिर परिसरात बसून आकर्षक चित्रे रेखाटली. मंदिरात खास महाशिवरात्री साठी बनवलेल्या साडेचार फुट संगमरवरी शिवलिंगाचे दर्शनासाठी सातारकर भावीकांनी मोठी गर्दी केली होती.मंदिरातील श्री मूलनाथेश्र्वराचे नजीक विशेष मंचावर हे शिवलिंग विविध रंगी विद्युत झोतात पहाण्यासाठी आकर्षंक सजावटीने ठेवण्यात आले होते.

रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावून मंदिरात गर्दी केल्याचे दिसून येत होते.