Breaking News

जिल्ह्यात दारुबंदी चळवळ पुन्हा गारठली


राज्यात दारूबंदीची पायाभरणी करणार्‍या खटाव तालुक्यात अवैध दारू व्यवसाय पुन्हा तेजीत
खटाव / सदानंद जगताप : दारुबंदी चळवळीची मुहूर्तमेढ रोवुन सातारा जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला दिशा देणार्‍या खटाव तालुक्यातच बहुतांशी गावातुन अवैध दारु व्यवसाय तेजित असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच खटाव तालुक्यातच दारुबंदी चळवळ पुन्हा गारठल्याची चर्चा जनसामान्यातून होत आहे. तालुक्यातील सिध्देश्वर कुरोलीच्या महिलानी संघटीत होवुन, सर्वप्रथम दारुबंदीसाठी लढा दिला. त्यानंतर केवळ खटाव तालुक्यातच नव्हे तर, उभ्या महाराष्ट्रासह इतर राज्यातुनही दारुबंदी चळवळीने जोर धरला व गावेच्या- गावे दारुमुक्त झाली. मात्र नंतरच्या काळात राजकिय ईर्षेपोटी, याच खटाव तालुक्यातील खटाव गावानेच प्रथम या चळवळीला मोडीत काढण्याचे नाट्य जाणीवपुर्वक घडवुन आणले. तरीही त्यापाठोपाठ दरुज गावात महिलांनी अवैध दारुविक्रीविरोधात रणशिंग फुंकले व अवैध दारु व्यवसाय करणार्‍यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र महिलांच्या याही लढ्याला पुरेसे पाठबळ न मिळाल्याने तेथील महिला एकाकी पडल्या व दरुजमधील दारुबंदी चळवळ मोडीत निघाली. शासनाच्या विविध अभियानांतून सहभाग घेवुन अनेक पुरस्कार मिळवत, महाराष्ट्रभर गावच्या नावाचा डंका मिरवणार्‍या गावात आजही खुलेआम दारु विक्री होत असल्याची चर्चा आहे. गावात दारुबंदी होवु नये, म्हणुन महिलाना एकाकी पाडण्याची खेळी समाज कंटक अथवा स्थानिक पुढार्‍यांच्या माध्यमातुन खेळली जाते.त्यात प्रशासनाचेही पुरेसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातिल अनेक गावातुन दारुबंदी होवुनही, कुठे छुप्या पध्दतीने तर कुठे खुलेआम अवैध दारु विक्री होते आहे. खटाव तालुक्यातिल बहुतांशी गावातुन अवैध दारूविक्री तेजीत सुरु आहे. त्यामुळे तरुण वर्ग या दारुच्या विळख्यात सापडुन पुर्णत: आहारी जाताना दिसत आहे.आज मितीला अवैध दारु विक्रीत्यावर कोणाचेच नियंत्रण नाही की बंधनही नाही. त्यांना शासकीय यंत्रणेचा धाकच उरला नाही. त्यामुळे अवैध दारु विक्रीते शिरजोर झाले आहेत. कोणत्याही यंत्रणेचा धाक न राहिल्यानेच, अवैध दारु धंदेवाले शिरजोर झाले आहेत. अवैध दारु विक्रीबाबत महिलाकडून अथवा अन्य कोणाकडुन तक्रार करुनही काही उपयोग होत नाही. तक्रारी बाबत सोईस्कररित्या कानाडोळा केला जातो. या दारु विक्रेत्यांना राजकारणी व शासन यंत्रना जाणीवपुर्वक पाठराखण करतायत का ? असा प्रश्र्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. पोलिस यंत्रणेची अनिश्र्चीत व संशयास्पद भूमिका, सुस्त स्थितीतील राज्य उत्पादन शुल्क विभागही अशा विचित्र स्थितीमुळे अशा व्यवसायांविरुध्द कोणीही तक्रार करायला धजावत नाही. त्यातच स्थानिक व वरीष्ठ राजकारणी मंडळींकडून दारुविक्रेत्यांना पाठीशी घालुन उलट त्यानाच पाठबळ देत असल्याने जोमाने फोफावणारी चळवळ कायम स्वरूपी न राहता, गेल्या एक-दोन वर्षापासुन पुन्हा गारठुन गेली आहे. दारु विक्रीते व शासकीय यंत्रणा यांच्यातील साटे - लोटे व्यवहार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कानाडोळा करण्याच्या प्रकाराची चर्चा खुले आम जनतेतुन होत आहे. मात्र कधीच कोणावर कायम स्वरुपी कार्यवाही होताना दिसत नाही. याचाच गैरफायदा घेऊन बेकायदा दारु व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. स्थानिक पोलिस यंत्रणा व प्रशासन अशा दारु विक्रेत्यांकडे कानाडोळा करत असल्याने, आता दस्तुरखुद्द जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते व जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनीच जातीने लक्ष घालुन जिल्ह्यातिल दारुबंदीला पाठबळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच जिल्ह्यातिल अवैध दारु धंद्यासह इतरही अवैध धंद्याना चाप बसेल. व अवैध धंद्यांच्या गर्तेत अडकत चाललेली तरुणाई वाचेल.