Breaking News

पोषण अभियानात नगर जिल्हा देशात अग्रेसर : राजश्री घुले


अहमदनगर/प्रतिनिधी : “ जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी विभागातील पोषण अभियानात महिलांनी दिलेल्या योगदानामुळेच नगर जिल्हा देशपातळीवर झळकला आहे. भविष्यातही महिलांच्या योगदानातून जिल्हा योजना अंमलबजावणीत अग्रेसर राहील’’, असा विश्‍वास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी व्यक्त केला.

शासनाच्या पोषण अभियानांतर्गत झालेल्या उत्कृष्ट कामांमुळे नगर जिल्ह्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण विभागाने अभियानात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या महिलांचा गौरव केला. यावेळी पोषण पंधरवडा, बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिकांची जिल्हास्तरीय कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, डॉ.संदीप सांगळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप मुरंबीकर, सुरेश टेळे, संजय गायकवाड, अ‍ॅड.निर्मला चौधरी, डॉ.रजीया शेख, पी.पी.वाघ, डॉ.सारीका सुरासे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने म्हणाले, “गरोदर माता व बालकांच्या पोषणासाठी राबविण्यात आलेल्या सरकारच्या पोषण अभियानात नगर जिल्ह्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यातून नगरची एक चांगली ओळख देशाला झाली आहे. आता नव्याने पोषण पंधरवडा सुरू होत आहे. यातही अशीच कामगिरी अंगणवाडी सेविका करतील, असा विश्‍वास आहे. जागतिक महिला दिनी सर्वांनी पुन्हा एकदा नव्या पोषण अभियानात भरीव योगदान देण्याचा संकल्प करावा.’’
उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, महिला कर्मचारी उपस्थित होते. वैशाली कुकडे यांनी सूत्रसंचालन केले. सोपान ढाकणे यांनी आभार मानले.