Breaking News

‘मैं भी चौकीदार’ मोहिमेला निवडणूक आयोगाकडून नोटीस


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या ’मैं भी चौकीदार’ च्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी भाजपाला नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ च्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे.

निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस पाठविली असून प्रचाराचा व्हिडिओ परवानगी न घेताच सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा जाब विचारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मैं भी चौकीदार’ असलेला व्हिडिओ भाजपाचे निवडणूक समितीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नीरज यांना उत्तरासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे. आयोगाने सांगितले की, 16 मार्चला या प्रकरणी मिडिया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग समितीने भाजपाला नोटीस पाठविली आहे. ‘मैं भी चौकीदार’च्या प्रचाराच्या व्हिडिओमध्ये भाजपाने जवानांचेही चित्रिकरण दाखविले आहे. निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोंचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती.


मात्र, यानंतरही भाजपाने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केला आहे. यावर आयोगाने जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वीच आपल्या ट्विटरवरील नावासमोर चौकीदार असे लिहिले होते. यानंतर सर्व नेत्यांनीही हाट कित्ता गिरवला होता. ‘मैं हूं चौकीदार’ ही मोहिमही भाजपाकडून राबविली गेली. तसेच नेटकर्‍यांना या अभियानाशी जोडण्याचे आवाहनही करण्यात आले होते. यावेळी भाजपाने हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकर्‍यासह पत्रकार, शिक्षक, मुलांनी स्वत:ला चौकीदार असल्याचे म्हटले होते. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमनियन स्वामी यांनी चौकीदार न लावल्याचे कारण सांगितले होते. मी ब्राम्हण असून नावापुढे चौकीदार लावू शकत नाही. मी ज्या सूचना करेन त्यानुसार चौकीदाराला काम करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.