Breaking News

कासारेच्या बिरोबा मंदिरातील दागीणे चोरीतील आरोपी मुद्देमालासह ताब्यात


पारनेर/प्रतिनिधी : कासारे येथील बिरोबा देवस्थान मंदिरातील दागीणे चोरीतील दोघांसह सोनार मुद्देमालासह ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पारनेर तालुक्यातील कासारे येथील बिरोबा मंदीरातील बिरोबा महारांच्या मुकूटावरील साडे पाच किलोची नागफणी सह दाणपेटीफोडून रोख रक्कम चोरी गेल्याची देवस्थानचे पुजारी रावराहेब पांडुरंग शिंदे यांनी पारनेर पेलिसांत दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अधीक माहीती अशी की, शुक्रवार दि.8 रोजी रात्री कासारे येथील बिरोबा मंदिराचे ग्रिलचे कुलूप तोडून बिरोबा देवाच्या डोक्यावरील साडे पाच किलो चांदीची नागफणी (तीन लाख रूपये किंमत) व दाणपेटीतील अंदाजे दोन हजार रूपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त खबर्‍यांमार्फत यंत्रणा सक्षम करत अवघ्या चार दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे.
याबाबत अधीक माहीती, गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहीतीनुसार सदर गुन्हा संतोष बर्डे रा.अकलापूर,ता.संगमनेर याने व त्याच्या साथीदाराने मिळून चोरी केली आहे.

 त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, रोहन खंडागळे, स.फौ.सोन्याबापू नानेकर, पो.हेड कॉ.दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पो.ना.सुनिल चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, पो.ना.रविंद्र कर्डीले, मोहन गाजरे, बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, ज्ञानेश्‍वर शिंदे, चालक संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांनी अकलापूर ता.संगमनेर येथे जावून मिळालेल्या माहीती नुसार आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कळंब,ता.आंबेगाव,जि.पुणे येथे राहत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कळंब येथे जावून आरोपीचा शोध घेवून संतोष एकनाथ बर्डे (वय-42) रा.कळंब,ता.आंबेगाव,जि.पुणे यास ताब्यात घेतले. 

सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली असता हा गुन्हा त्याचा साथीदार गणेश गांगुर्डे रा.हिवरे कोर्डा,ता.पारनेर दोघांनी मिळून केला असल्याची कबूली दिली. त्यानुसार आरोपी संतोष बर्डे याची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 1 लाख 46 हजार 160 रूपये किमतीचे 3 किलो 654 ग्रँम वजनाच्या दोन चांदीच्या विटा मिळून आल्याने त्या ताब्यात घेतल्या. सदर चांदीच्या विटा बाबत विचारपूस केली असता सदर विटा ह्या कासारे येथील बिरोबा मंदीरातील चोरून नेलेल्या नागफणीचे लोणी प्रवरा येथील सराफ मनोज चंद्रकांत उदावंत यांचे कडून तुकडे करून वितळून विटा तयार करून घेतल्या असे सांगितले. त्यानुसार आरोपी गणेश गांगुर्डे व सराफ मनोज उदावंत यांचा शोध घेवून गणेश जयराम गांगुर्डे (वय 32) रा.हिवरे कोर्डा,ता.पारनेर व मनोज चंद्रकांत उदावंत (वय-43),रा.म्हस्के गल्ली,लोणी प्रवरा,ता.राहता यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.