Breaking News

सासपडेत ब्राऊनिंग मशीनचा अपघात


नागठाणे, (प्रतिनिधी) : सासपडे (ता. सातारा) गावच्या हद्दीत गणेशखिंड परिसरात असणार्‍या दगड खाणीवर ड्रीलींग करणारे ब्राऊनिंग मशीन घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला शनिवारी दुपारी अपघात झाला. त्यामध्ये बाळासाहेब साळुंखे (रा.नागठाणे) हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याची नोंद रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी गणेशखिंडीत असणार्‍या खाणीजवळ डोंगराउताराने दगडांना ड्रीलींग पाडणारे कॉम्प्रेसर ब्राऊलींग मशीन घेऊन एक ट्रॅक्टर-ट्रॉली निघाली होती. उतारावरून वेगात जात असलेल्या या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात तो उतारावरून जात असतानाच रस्त्याशेजारी असणार्‍या ओढ्यात कोसळला. त्यावेळी ट्रॉलीत असणारी मशीन ट्रॅक्टरवर येऊन पडली. सुदैवाने चालकाने ट्रॅक्टरमधून वेळीच उडी मारल्याने तो बचावला. मात्र त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याचे समजते. चालकाला खाजगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात नेले.