Breaking News

ओपन स्पेस गिळंकृत करण्याचा भूमाफियांचा घाट


अहमदनगर / प्रतिनिधी : मुकुंदनगर येथील फकीरवाडा ते दर्गा दायरा दरम्यान सोडण्यात आलेले ओपन स्पेस भूमाफिया गिळकृंत करण्याचा घाट घालत असताना महापालिकेने तातडीने ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटवून या जागा ताब्यात घेण्याची मागणी जागृती कृती संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना देऊन चर्चा केली. यावेळी संस्थेचे सचिव सय्यद मुनीर दादामिया, शेख अब्दुल कादर, हाजी उस्मान गणी, अब्बास शेख आदिंसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

फकीरवाडा ते दर्गा दायरा दरम्यान महापालिकेचे 26 ठिकाणी ओपन स्पेस आहे. या जागेवर अनेक भूमाफियांनी अतिक्रमण करून ही जागा हडपण्याचा प्रकार चालविला आहे. सर्वे नंबर 346/1 ब/ क ह्या ओपन स्पेसवर मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद शाळेचे सचिव याने अनाधिकृत बांधकाम करून, ही जागा हडपण्यासाठी कब्जा केलेला आहे. याप्रकरणी संस्थेने हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेस वेळोवेळी पाठपुरावा केला असता उपायुक्तांनी दि.12 फेब्रुवारीस 15 दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापी ही अतिक्रमण काढण्यात आलेली नाही.

तसेच मुकुंदनगर मधील इतर 26 ठिकाणी असलेल्या ओपनस्पेसवर अतिक्रमण झालेले असून, मनपा प्रशासनाने तातडीने सदरील अतिक्रमण हटवून ओपनस्पेस ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदरील अतिक्रमण न हटविल्यास उपोषण करुन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.