Breaking News

पंतप्रधान मोदी अंबानी व नीरव मोदीचे चौकीदार : राहुल गांधी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत सर्वांना मोठमोठी आश्‍वासने देतात. कधी कोणाच्या खात्यात 15 लाख तर कधी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याबद्दल बोलतात. गरीबांना ताकदवान बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जे शब्द दिले ते कधी पूर्णच झाले नाहीत. मोदी हे देशाचे चौकीदार नसून ते अनिल अंबानी, नीरव मोदी यांचे चौकीदार असल्याची घणाघाती टीका काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. ते राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील सभेत बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की मी चौकीदार आहे. मात्र, ते कोणाचे चौकीदार आहेत हे त्यांनी कधीही सांगितले नाही. तुम्ही कधी शेतकर्‍यांच्या घरी, बेरोजगार तरुणांच्या घरी चौकीदार पाहिला आहे का? अंबानींच्या घरी किती चौकीदार आहेत? चौकीदारांची तिथे रांग लांगली आहे. जर देश एक आहे तर सर्वांनाही एक व्हायला हवे. इथे समाजातील प्रत्येक वर्गासाठी जागा हवी. पण पंतप्रधान मोदी यांना भारतात केवळ श्रीमंतच दिसत असून ते त्यांच्यासाठीच स्वप्न पाहत असल्याचा आरोप गांधी यांनी केला.पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योगपतींचे साढे तीन लाख कोटी रुपये माफ केले. 

गेल्या पाच वर्षात गरीब केवळ गरीबच झाले. आम्ही शेतकरी आणि छोट्या व्यापार्‍यांच्या हिताचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. पण पाच गेल्या पाच वर्षात जे काही झाले त्यावरून देशातील सामान्यांना काय मिळाले हे तुम्हालाही समजेल असेही राहुल म्हणाले. देशाच्या विविध भागातील दलित समाज आणि अल्पसंख्यांकासोबत काय झाले हे देखील तुम्हाला माहीत असेल असेही ते म्हणाले. जर विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्‍न विचारला तर ते त्यांना देशद्रोही ठरवतात. देशाच्या विकासात बाधा आणल्याचा ठपका त्यांच्यावर लावला जातो. एवढंच नव्हे सरकारला तुम्ही सल्ला देखील देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी एक विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम देखील तुम्ही सर्वांनी पाहीला असेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले. 

राहुल म्हणाले, गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदींनी गरीबांना मदत करणार्‍या योजनांना विरोध करण्याबरोबरच त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. मनरेगाला त्यांनी खड्डे खणण्याची योजना म्हणून हिणवलं. मात्र, त्यांना हे कधीच कळलं नाही की, या योजनांनी 14 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. म्हणजेच ज्या लोकांना काँग्रेसने गरीबीतून बाहेर काढले त्यांना मोदींनी गेल्या 5 वर्षांत त्या सर्वांना पुन्हा गरीब बनवून टाकले. जनतेला 15 लाख मिळाले नाहीत, 2 कोटी नोकर्‍याही मिळाल्या नाहीत. शेतकर्‍यांची कर्जेही माफ झाली नाहीत. तसेच जनतेने आपल्या घरांमध्ये जो पैसा वाचवून ठेवला होता तोही मोदींनी नोटाबंदी करुन हिसकावून घेतला, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.