Breaking News

तीन चाराछावन्यांचे परवाने रद्द


शेवगाव/ प्रतिनिधी: राज्यात मोठी दुष्काळी अवस्था आहे. यावर उपाययोजनाही चालू आहेत. यासाठी चाराछावण्यांची व्यवस्था करण्याचे काम चालू आहे. परंतु चारा छावणीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात छावणी सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा टाळाटाळ करणाऱ्या तीन संस्थांची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील दोन संस्थांचा तर पाथर्डी तालुक्यातील एका संस्थेचा समावेश आहे.

नगर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १९५ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. छावणी सुरू करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत चारा छावणी सुरु करावी असे निर्देश संबंधित संस्थांना देण्यात आले होते. त्यानंतरही काही संस्था चारा छावणी सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा संस्थांना चारा छावणी सुरू करण्याची देण्यात आलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आली आहे. 

यापूर्वी सहा चारा छावण्यांचे मंजुरीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेले आहेत. आता पुन्हा पाथर्डी तालुक्यातील एक तर शेवगाव तालुक्यातील जोहरापुर आणि अधोडी या गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. त्यामुळे परवानगी रद्द केलेल्या चारा छावण्यांची संख्या आता ९ झाली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये चारा छावण्यांवर दररोज ३१ लाख १८ हजार रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.