Breaking News

मोदींच्या विरोधात वाराणसीतून प्रियंका?


रायबरेली (उत्तर प्रदेश)ः काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून त्या निवडणूक लढवणार, की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करीत आहेत. रायबरेलीमध्ये अशाच एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्य ावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको, असा सवाल प्रियंका यांनी विचारला. त्यामुुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

उत्तर प्रदेशात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवीत आहेत. म्हणूनच वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियांका गांधी अशी लढत असणार का, असाही प्रश्‍न विचारला गेला. ‘सोशल मीडिया’वर या चर्चेला आणखीनच वेग आला. अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तर रायबरेलीमधून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी निवडणूक लढवणार आहेत. आईच्या प्रचाराच्या वेळी प्रियांकांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हे वक्तव्य केले.

वाराणसीमधून मोदी यांच्या विरोधात काँग्रेस आणि सप-बसप आघाडीने अजून उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळेच प्रियंका काँग्रेसतर्फे इथून मोदी यांना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली.2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगला होता. यात काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचे नाव एवढे पुढे आले नव्हते; पण या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. आता या वेळी मोदी यांच्या विरोधात कोण याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. प्रियंका या वेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. सप-बसपची आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्याशी त्या कसा सामना करतात, ते पाहावे लागेल.


रावणाचे काय?

वाराणसी मतदारसंघात चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांच्या नावाची चर्चा चालू आहे. भीम आर्मीचे संस्थापक असलेल्या रावण यांनी मोदी यांना आव्हान दिले आहे. त्यांची मध्यंतरी प्रियंका यांनी भेट घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रियंका यांनी स्वतःच निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना प्रश्‍न विचारून भाजपत संभ्रम निर्माण करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी चर्चा चालू आहे.