Breaking News

औषधालाही कमळ शिल्लक राहणार नाही


सोलापूर : महाराष्ट्रात असे तणनाशक फवारणार आहे, ज्यामुळे औषधाला सुद्धा कमळ दिसणार नसल्याची खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सुरूवात कोल्हापूरमधून झाली. यावेळी भाजपच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच टीकेला राजू शेट्टी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, त्यांनी उध्दव ठाकरे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर देखील टीका केली आहे. 

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरात राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला सडेतोड उत्तर राजू शेट्टी यांनी दिले आहे. ‘आमचे बोट धरून तुम्ही शिवारात आला आहात आणि आता आम्ही असे तणनाशक महाराष्ट्रात फवारणार आहोत. ज्यामुळे औषधाला सुद्धा कमळ दिसणार नाही’, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘चौकीदार चोर म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंनी मला शहाणपणा शिकवू नये, असा असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेट्टी हे चोराच्या आळंदीला गेल्याची टीका केली होती. त्यांच्या टिकेला उत्तर देताना, चौकीदार चोर आहे असे म्हणणार्‍यांनी आधी चौकीदार सज्जन कधी झाला, हे सांगावे, असा टोला राजू शेट्टी यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढणार आहोत. आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे असे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

महाआघाडीने दोन जागा स्वाभिमानाला द्याव्यात, अन्यथा मला हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढणे भाग आहे. मात्र मी चालत्या गाडीला गुना लावणार नाही की आघाडीला अपशकुन करणार नाही. राज्यात अन्यत्र उमेदवार उभे करणार नाही. मतविभागणीचा फायदा भाजप, शिवसेनेल होईल असे काही करणार नाही, त्यात आमचे कितीही नुकसान झाले तरी सुद्धा असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले. या बैठकीनंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘संघर्ष हा माझा स्वभाव आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला परिस्थितीने एकत्र आणले आहे’, असा उल्लेख करून शेट्टी म्हणाले,’ मागीलवेळी मी त्यांच्यासोबत गेलो, पण मोठा अपेक्षाभंग झाला. केंद्र सरकारच्या निष्क्रिय कामगिरीमुळे नरेंद्र मोदी - अमित शहा वगळता सर्वजण नाराज आहेत. शेती, वस्त्रोद्योग याची वाताहत झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

आपल्या भविष्याचा विचार करा
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा समाचार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. ‘काटा मारणार्‍या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी बसले आहेत. त्यांचा काटा जनता काढेल’, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली होती. सदाभाऊ खोतांच्या या टीकेचा समाचार घेताना शेट्टींनी खोत यांना ‘लुंग्या संग्याची उपमा देत, आपल्या भविष्याचे काय होईल? याचा विचार करावा’, असा खोचक सल्ला दिला आहे. तसेच, ‘महायुतीच्या व्यासपीठावरच काटा मारणारे किती कारखानदार होते, हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करू’, असा टोला देखील त्यांनी सदाभाऊ खोतांना लगावला आहे.