Breaking News

सातार्‍याची हद्दवाढ होणार तरी कधी ? साशंकता कायम : मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील देवूनही वर्षभरापासून हद्दवाढीचे भीजत घोंगडे


सातारा / प्रतिनिधी : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्र्न प्रत्यक्षात केव्हा मार्गी लागणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांतून विचारला जात आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्र्न चर्चेत असला आणि राजकीय नेत्यांपासून ते शासनकर्त्यांपर्यत सर्वांकडून याबाबत घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात काय होणार ही साशंकता कायम आहे.

शिवस्वराज्याची राजधानी असणारा सातारा हा संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेले ऐतिहासिक शहर आहे. सातार्‍यात खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या उपस्थितीत हद्दवाढीच्या प्रस्तावला मान्यता देऊन एक प्रकारे ही बाब अधोरेखितच केली आहे. शिवाय नुकतीच सातार्‍याच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्र्नावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आदेश कधी निघतो याची वाट पाहणे एवढेच सातारकरांच्या हाती आहे. याप्रश्नी नेहमीप्रमाणे श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी हद्दवाढीसाठी सुरूवातीला काही प्रमाणात तरी प्रयत्न केले होते, ही बाब नाकारण्याचे कारण नाही. या संदर्भात सातारच्या आमदारांनी मौन बाळगले होतेे तरी खासदारांनी मात्र हद्दवाढ गरजेची आणि कालानुूरुप आहे असे सांगून आपल्या संमतीची मोहोर या प्रश्नावर उठवली होती, ही दिलासादायक बाबच मानावी लागेल. दरम्यान ही हद्दवाढ कोण्या नेतृत्वाची राजकीय गरज म्हणून नव्हे तर या परिसरात राहणार्‍या नागरिकांची व्यावहारिक गरज म्हणूनही प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. हे नाकारून चालणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातार्‍याच्या अवतीभोवती असलेली चार जिल्ह्याची ठिकाणे सर्वसाधारण विकासाबाबत एकाच पातळीवर होती असे म्हणले तर ते वावगे ठरणार नाही. पुणे वगळता सातार्‍याला लागून असलेली कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी ही चारही जिल्ह्याची ठिकाणे विकासाबाबत सर्वसाधारण एकाच पातळीवर होती. त्यातील कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर ही शहरे तेथील नेतृत्त्वाच्या दूरदृष्टीने विकसित झाली.
सातार्‍यातील रस्त्यांपासून ते पाणीपुरवठ्यापर्यंत कामाच्या कितीही गर्जना होत असल्या तरी प्रत्यक्षात असलेली स्थिती आपण अनुभवत आहोत. याचे एक कारण नगरपालिकेतून बोकाळलेला ठेकेदार प्रणित भ्रष्टाचार हे असले तरी दुसरे कारण नगरपालिकेकडे असलेले अपुरे अर्थस्रोत आहे हे नाकारून चालणार नाही. शहरात समाविष्ट झालो तर आपल्याला थोडी वाढीव घरपट्टी भरावी लागेल या मध्यमवर्गीय मानसिकतेतून या ग्रामपंचायतींचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याच्या प्रयत्नांचा पाठपुराव केला. याचबरोबर गल्लीबाज नेतृत्वाचे अस्तित्व हद्दवाढ झाली तर कालबाह्य ठरेल या भीतीनेही काहींकडून या हद्दवाढीला जाणीवपूर्वक विराध होत आला आहे. या ग्रामपंचायतींचे अस्तित्त्व स्वतंत्र असले तरी तरी त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्याचे काम मात्र सातारा पालिका क्षेत्रातूनच होत आहे. या नगरपालिकेशी संबंध नसलेल्या नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी सुविधा निर्माण करून त्याची देखभाल करणे आणि नव्यासुविधा ओढाताण आर्थिक जुळणी करून निर्माण करणे, ही जबाबदारी नाईलाजाने पालिकेवरच पडत आहे.

कोणत्याही पातळीवर विकासाच्या मार्गाने वाटचाल करणे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अशक्य असल्याने सातारा शहर हे ऐतिहासिक असले तरी तुलनेने अविकसित शहर राहिले आहे. त्याचबरोबर कर्तृत्वशून्य नगरसेवक हे आपल्या परंपरा आणि स्थानिक वट यांच्या जोरावर पात्रता नसताना नगरसेवक म्हणून पालिकेत ठाण मांडून बसले आहेत हे वास्तव आहे. हे सारे टाळायचे असेल तर शहराला आधिक व्यापक स्वरुप द्यावे लागेल. आणि सर्व सुविधा असूनही अविकसित शहर ही ओळख पुसून विकसित आणि प्रगत शहर म्हणून या ऐतिहासिक शहराला सन्मानाचे स्थान मिळावे असे वाटत असेल तर हद्दवाढ ही अपरिहार्य आहे.