Breaking News

खंबाटकी घाटात ट्रक उलटून एकाचा मृत्यूखंडाळा /प्रतिनिधी : सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर पहिल्याच वळणावर पुण्याकडे जाणारा ट्रक पलटी झाला. यावेळी महामार्गावर डिझेल सांडल्याने वाहने घसरुन विचत्र अपघात होऊन दोन-तीन वाहने एकमेकांस धडकली. यात दुचाकी चालक सुदर्शन राजेंद्र पवार (वय 19 रा. मलकापूर ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. यावेळी एक ट्रकचालक मोहन महादेव बेडगे (वय 30 रा. सणसवाडी, चिकोडी राज्य कर्नाटक) हेही किरकोळ जखमी झाले आहेत.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडून ट्रक (एमएच 04 सीए 3830) पलटी होऊन रस्त्यावर डिझेल सांडले होते. यावेळी पाठीमागून येणारा ट्रेलर (आरजे 14 जीके 2970) व टेम्पो (एमएच 10 एजी 3257) यांची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत युवकाकडील वाणिज्य शाखेतून बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र सापडल्याने त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना मदत झाली.