Breaking News

स्त्रीला निसर्गाने नवनिर्मितीचा मान दिला : डॉ.प्रज्ञा चांगाडे

विवेकानंद आश्रमात महिला दिनानिमित्त महिलांना औषधींचे वाटप
हिवरा आश्रम,(प्रतिनिधी): महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता समतोल
आहार घ्यावा. विद्यार्थिनींनी बुध्दीसोबतच शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत
जागरूक असावे. स्त्रीला निसर्गाने निर्मितीचा मान दिला असून महिलांनी स्व
सामर्थ्याची जाणीव ठेवावी. जीवनातील कोणत्याही समस्येशी व संकटाशी सामना
करण्याची शक्ती निर्माण करणे म्हणजेच सबल होणे असे प्रतिपादन स्त्रीरोग
तज्ज्ञ डॉ.प्रज्ञा चांगाडे यांनी केले.

येथील विवेकानंद आश्रमात जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.
प्रज्ञा चांगाडे व लेखिका खडसे, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते उपस्थित
होते. कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, शारदादेवी
यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिक्षणाशिवाय महिलांंची प्रगती
नाही. शुकदास महाराजांनी या परिसरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी संधी
उपलब्ध करून दिली आहे. त्यादृष्टीने या परिसरात पोषक असे वातावरण निर्माण
झाले आहे. या संस्थेतून शिक्षण घेऊन दरवर्षी हजारो विद्यार्थिनी बाहेर
पडत आहे. विवेकानंद आश्रम ज्ञान प्रसाराचे केंद्र बनले आहे. या परिसरात
मुलींना प्रवेश दिल्यावर मुलींची सुरक्षा,गुणवत्ता व तिच्या
व्यक्तिमत्वास आवश्यक असलेले सर्व घटक या ठिकाणी उपलब्ध आहेत असे विचार
उषा खडसे यांनी व्यक्त केले. दुर्बलतेचा भाव काढून टाकल्याशिवाय सबलतेकडे
व सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू होत नाही. महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही
क्षेत्र आता बाकी राहिले नसून मुलींनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.
हिवरा आश्रम येथे शिकलेल्या विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात
आहे. तसेच नोकरीच्या क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आपला विकास, प्रगती व
सक्षमीकरण हीच शुकदास महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे असे विचार
विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी
उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधींचे वाटप करण्यात
आले. यावेळी व्यासपीठावर विश्‍वस्त पुरुषोत्तम आकोटकर,वैद्यकीय अधिकारी
डॉ.गजानन गिर्‍हे, सुनील ठेंग, पत्रकार संतोष थोरहाते यांच्यासह उपस्थित
होते. दरम्यान जान्हवी डोसे, मनीषा भगत, दीपाली शिंदे या विद्यार्थिनींनी
मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवानी रडार तर आभार प्रदर्शन जान्हवी
डोसे हिने केले.
----------------------