Breaking News

जळगाव चौफुला उपसरपंचपदी प्रियांका जाधव बिनविरोध


मिरजगाव/प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील जळगाव चौफुला येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या आणि राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेल्या जळगाव चौफुला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका दिपक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड जाहीर होताच समर्थकांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण करीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंच होण्याचा मान थेट जनतेतून प्रचंड मतांनी निवडून आलेले सरपंच अभियंता भैरवनाथ शेटे यांच्या गटाच्या प्रियांका जाधव यांना मिळाला आहे. या निवडणुकीत काळ भैरवनाथ परिवर्तन पॅनलने नऊ पैकी सहा जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते.

आज येथील उपसरपंचपद निवडीसाठी सरपंच भैरवनाथ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक गट विकास अधिकारी परमेश्‍वर सुद्रिक यांच्या निरीक्षणाखाली खास बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये प्रियांका जाधव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या वेळी मारुती शेटे, रामभाऊ शेटे, बाळासाहेब जाधव, सचीन शेटे, सावन शेटे, सुदाम जाधव, शंकर जाधव, विष्णू जाधव, जयराम साबळे, राजेंद्र शिंदे, अभिमन्यू काळन्गे, गोरख गायकवाड, कुंडलिक गायकवाड, भगवान साळवे व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.