Breaking News

अझहरची संपत्ती जप्त करण्याचा फ्रान्सचा निर्णयनवीदिल्लीः संयुक्त राष्ट्रात ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर फ्रान्सने अझहरची संपत्ती जप्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘जैश’विरोधात फ्रान्स सरकारची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. मसूदच्या बाजूने चीनने नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर टीकास्त्र सोडले होते.

मसूद अझहरचे नाव युरोपीय संघाने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे फ्रान्स सरकारच्या गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्याबाबत पाकिस्तानवरही जागतिक दबाव वाढत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने चौथ्यांदा आडकाठी आणली आहे. मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याच्या काही मिनिटे अगोदर चीनने नकाराधिकाराचा वापर करत प्रस्ताव रोखला. 2017 मध्येही चीनने असेच केले होते. गेल्या 10 वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रात मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा हा चौथा प्रस्ताव मांडण्यात आला होता.