Breaking News

सिध्दटेकचे शासकीय विश्रामगृह भग्नावस्थेत


कर्जत: तालुक्यातील सिध्दटेक येथील विश्रामगृहाची वापराविना दयनिय अवस्था झाली आहे. सिद्धिविनायक मंदीराच्या पश्‍चिमेला बांधलेले विश्रामगृह भग्न बनले असून त्यातील साहित्याची मोडतोड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकास समिती यांच्याकडून होत असलेल्या देखरेखीच्या अभावामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेली भव्य इमारत कोसळू लागली आहे. सिध्दटेकची व्यथा थांबायचाच तयार नसून कामासाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी फक्त पगारापुरतेच उरल्याचे चित्र दिसत आहे.

विविध भागातून येणारे अधिकारी, पदाधिकारी, मंत्री आदींच्या मान्यवरांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी हे विश्रामगृह बांधण्यात आले. मात्र, त्याची सध्याची स्थिती पाहता वापर करणे दुरापास्त झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची बिकट अवस्था झाली आहे. सभोवती काटेरी झाडे झुडपे वाढली असून परिसर ओसाड बनला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे विश्रांतीगृह नेहमीच कुलुप बंद असते. मान्यवरांच्या आरामदायी विश्रांतीसाठी येथे शासनाकडून कॉट, गाद्या, खुर्च्या, टेबल आदी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. मात्र, वापराविना त्याची दैना झाली आहे. फर्निचर तसेच खिडक्या दरवाजांची मोडतोड झालेली आहे. गाद्या, उशा यांचा कुबट वास सुटला आहे. 

अनेक वर्षे हे विश्रांतीगृहात कोणी वास्तव्यास राहिले असल्याच्या पाऊलखुणा मिळत नाहीत. सिद्धटेकच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. येथील परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्यावर ग्रामपंचायतचा अधिकार चालतो.’नियोजन व विकास समिती’ अशा गोंडस नावाखाली शासनाने समिती स्थापन केली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीच्या विविध बैठका होतात. त्यामध्ये विकासावर चर्चाही होते. ठरावही संमत होतात. मात्र, अंमलबजावणीचीच बोंब असल्याने सिद्धटेक बकाल होत चालले आहे. बांधकाम विभागाने लक्ष घालून योग्य देखरेख केल्यास इमारतीचा सदुपयोग होवु शकेल. मात्र, तशी अधिकारी यांची मानसिकता असताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.

दुर्लक्षामुळे इमारती भग्न

जिल्हा परिषद तसेच विकास समितीच्या भोंगळ कारभारामुळे सिद्धटेक देवस्थान परिसराला अवकळा आली आहे. लाखो रुपये खर्च करुन बांधलेले विश्रांतीगृह दिवसेंदिवस भग्न होत आहे. येथील बांधकामात वड, पिंपळ, सुबाभुळ अशी झाडे वाढु लागल्याने इमारत भग्न होत असून इमारतीला तडे जावू लागले आहेत. इमारतीचा वापर नसताना टाकीतील अतिरिक्त पाणी इमारतीत शिरत असल्याने इमारत जिर्ण होत आहे. इमारतीच्या बांधकामाला ठीकठिकाणी भेगा पडल्या आहेत.