Breaking News

आदर्श संसद ग्राम एनकूळमध्ये पाण्यासाठी रास्तारोको


कातरखटाव/प्रतिनिधी : तीव्र दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात पिण्याचे पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. प्रस्ताव सादर करुनसुध्दा लाल फितीच्या कारभारामुळे प्रशासनाकडून टँकर सुरु करण्यास हलगर्जीपणा होत आहे. याचा निषेध म्हणून संसद आदर्श ग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्यातील एनकूळ गावातील महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली.

एनकूळ हे गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आदर्श संसद ग्राम योजनेसाठी दत्तक घेतलेले गांव आहे. पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा कोणताही स्तोत्र उरला नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधन यासाठी लागणारे पाणी कसे उपलब्ध करावे हा शेतकर्यांच्या पुढे मोठा प्रश्र्न निर्माण झाला आहे .त्यासाठी नागरिक टाहो फोडत आहेत. याशिवाय पाण्याअभावी किमती दुधाळ जनावरे कवडीमोल बाजारभावाने विकावी लागणार आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना जीवन जगणे असह्य झाले आहे. गावामध्ये खरमाटे मळा, मांग खोरे वस्ती मधील नागरिकांनी एनकूळ-कातरखटाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात माजी सरपंच मंगल खरमाटे, अंकुशराव खरमाटे, मारुती खरमाटे, मधुकर खरमाटे, हनुमंत खरमाटे, हरिश्र्चंद्र खरमाटे, लोचन खरमाटे, नंदाबाई खरमाटे, श्री. शिंदे आदिंसह ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे प्रभारी अभियंता एस. के. झेंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून मागण्यांचे निवेदन स्विकारले. तसेच ग्रामस्थांना लवकरात लवकर पशुधन व पिण्याच्या पाण्याचे टँकर द्वारे पुरवठा करण्याचे आश्र्वासन दिले.