Breaking News

कराड बसस्थानकात मराठी राजभाषा दिन साजरा


कराड,(प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्र्वरांनी मराठी भाषेचा गोडवा व अमरत्व सिध्द केलेल्या आपल्या मराठी राजभाषेला आणखी वैभवाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी सातत्याने दर्जेदार मराठी साहित्याची निर्मीती व्हायला हवी. तसेच मराठीला वैभवाच्या कोंदणात ठेवण्यापेक्षा ती व्यावहारिक व ज्ञानभाषा कशी बनेल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन टिळक हायस्कूलमधील शिक्षक व सुप्रसिध्द व्याख्याते भरत कदम यांनी केले.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कराड बस स्थानकात आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. यावेळीेे आगारप्रमुख जीवनधर पाटील, वाहतूक निरिक्षक किशोर जाधव. प्रा. अनुराधा जाधव, लेखागार प्रकाश भांदिर्गे, वरिष्ठ लिपीक अरूण भोसले, वाहतूक नियंत्रक अनिल लटके, सौ.जामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.कदम म्हणाले, दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांच्या जागी आम्ही इंग्रजी शब्द वापरून मराठीची गळचेपी करत आहोत. संत ज्ञानेश्र्वरांबरोबरच अनेत संत व साहित्यीकांनी मराठीत विपूल लेखन करून मराठी भाषा समृध्द केली आहे. मात्र आज तरूण पिढीकडून ते वाचले जात नाही ही शोकांतीका आहे. माता या शब्दातून बालमनामध्ये संस्काराचे बीजारोपण होते तर माता ज्या भाषेतून संस्कार घडवते, त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. म्हणूनच माते एवढेच मातृभाषेला महत्व असल्याचा विसर आपणास पडता कामा नये.

या वेळी बसस्थानकात उपस्थित प्रवाशांना गुलाबपुष्पे देऊन मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा.अनुराधा जाधव यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. आगारप्रमुख जीवनधर पाटील यांनी स्वागत केले. अरूण भोसले यांनी सूत्रसंचाल, तर किशोर जाधव यांनी आभार मानले.