दर्जेदार शिक्षणाने सशक्त भारत घडणार -पारगावकर


अहमदनगर/प्रतिनिधी: दर्जेदार शिक्षणाने सशक्त भारत घडणार आहे. यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनी सामाजिक जाणीव ठेऊन शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहे. अनेक गरजूवंत शाळांना भौतिक सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या असून, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सुविधा निर्माण करुन देण्यात येत असल्याची भावना एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी व्यक्त केली.
जय आनंद फाऊंडेशन व निरंजन सेवाभावी संस्थेच्या विशेष प्रयत्नाने तर एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या अर्थसहाय्यातून घारगाव (ता.श्रीगोंदे) येथील सावित्रीबाई फुले प्राथ. व महात्मा फुले माध्य. निवासी शाळेस 18 लाख रु. खर्च करुन बांधण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पारगावकर यांच्या हस्ते थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मर्चंट बँकेचे संचालक तथा जय आनंद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश भंडारी, निरंजन सेवाअभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, तुळसाबाई खामकर, डॉ.ऋषभ फिरोदिया, शेखर देशमुख, लायन्स क्लबचे सचिव संदेश कटारिया, जय आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष गौरव बोरा, संतोष निकम, शंकर डोंगरे आदी उपस्थित होते. 
 
सदरील निवासी शाळेस शासकीय अनुदान नसल्याने खामकर कुटुंबीय पदरखर्च करुन वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. या कार्यासाठी कर्जबजारी होण्याची वेळ देखील त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेल्या वर्ग खोल्यांची मोठी दुरावस्था झाली असून, काही वर्ग खोल्यांचे वार्याने पत्रे देखील उडून गेले होते. ही परिस्थिती पाहून जय आनंद फाऊंडेशन व निरंजन सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी, सदस्यांनी शाळेच्या इमारतीसाठी पुढाकार घेतला. एल अ‍ॅण्ड कंपनीस पाठपुरावा करुन कंपनीच्या माध्यमातून 18 लाख खर्च करुन 10 वर्ग खोल्या, स्वयंपाक गृह, धान्य कोठार गृह, मुला-मुलींचे वसतीगृह, स्वच्छता गृहाचे बांधून नुतनीकरण करण्यात आलेल्या या वास्तूंचा लोकार्पण करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत शालेय संस्थेचे अध्यक्ष पोपट खामकर यांनी केले. प्रास्ताविकात अनिकेत भोसले यांनी सरकारी अनुदान नसताना वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने खामकर कुटुंबीय ही आश्रमशाळा चालवीत आहे. कर्जबाजारी होऊन देखील विद्यादानाचे पवित्र कार्य चालू असून, हे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी भापकर गुरुजी म्हणाले की, समाजकार्यासाठी ध्येय वेड्या मानसांची गरज आहे. कर्जबाजारी होऊन वंचित घटकांसाठी शाळा चालविण्याचे कार्य खामकर कुटुंबीयांनी केले आहे, विचारांची दिशा माणुसकीच्या जाणीवेतून बदलल्यास परिवर्तन घडणार आहे. यावेळी श्रीगोंदे पंचायत समितीचे मा.सदस्य रघुनाथ खामकर, नगरसेवक समीर बोरा, बेलवंडीचे सरपंच उत्तम डाके, सावता हिरवे, घारगावचे उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, विष्णू खामकर, दिपक खामकर, माऊली हिरवे, पोपट जाधव, पोपट खामकर आदिंसह जय आनंद फाऊंडेशन व निरंजन सेवाभावी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget