Breaking News

लिंपणगावच्या सरपंचा विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर--------


श्रीगोंदे/प्रतिनिधी: तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी साळवे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव गुरुवारी दि. 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता 14 विरुद्ध अशा मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.

तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी साळवे यांच्या विरोधात 7 मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार महेंद्र माळी यांनी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक बोलवली होती. यावेळी या बैठकीस सतरा सदस्यांपैकी तीन सदस्य गैरहजर राहिले. तर 14 सदस्यांनी या बैठकीस हजेरी लावून अविश्‍वास ठरावावर हात उंचावून मतदान करण्यास सहभाग घेतला. 

या बैठकीस सदस्य रवी उजागरे, पोपट माने, पद्माबाई टुले, अविनाश जंगले, शुभांगी सूर्यवंशी, बाळासाहेब जंगले, रेणुका धस, कांताबाई कोकाटे मंजुळा ओहोळ, ताराबाई वेताळ, मिलिंद भोईटे, सोमनाथ कुरुमकर , सविता शिंदे, रोहिणी कांबळे आदी सदस्यांनी अविश्‍वास ठरावामध्ये सहभाग घेतला. तर अशोक काळाणे, सरपंच माधुरी साळवे आणि जालिंदर कुरुमकर हे 3 सदस्य यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे सदरचा अविश्‍वास ठराव 14 विरुद्ध झिरो मतांनी मंजूर झाल्याची निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी यांनी घोषित केले. दरम्यान तीन वर्षात या अविश्‍वास ठरावाने मंजुळा ओव्हाळ, रेणुका धस या दोन माजी सरपंचांना अविश्‍वास ठरावाने पायउतार व्हावे लागले. 

आता विद्यमान सरपंच माधुरी साळवे यांनाही काल अविश्‍वास ठरावाने पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे. आता चौथ्यांदा सरपंचपदी कुणाची वर्णी लागते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सदरचा अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीसाठी पाठवून काही दिवसातच नूतन सरपंचाची निवड केली जाणार आहे.