Breaking News

‘जैश’चे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सुखोईतून बाँबहल्ल्याचा सराव
नवी दिल्लीः भारतीय वायु दलाने सुखोई-30 या लढाऊ विमानातून स्पाइस 2000 बॉम्बहल्ल्याचा सराव केला आहे. त्यामुळे भारताची दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र होणार, अशी चिन्हे आहेत.पाकिस्तानमधल्या बालाकोटमधल्या ‘जैश’ च्या तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर आता दहशतवादाविरोधातली ही मोहीम सुरूच राहील, असे भारतीय वायु दलाने दलाने म्हटले आहे. या मोहिमेसाठी हवाई दलाने काही चाचण्याही केल्या आहेत. हवाई दलाने सुखोई -30 विमानात स्पाइस 2000 बॉम्बची चाचणी करून पाहिली आहे.

स्पाइस 2000 हा बॉम्ब ‘जैश ए मोहम्मद’ चा खात्मा करण्यासाठी वापरण्यात आला होता. बालाकोटमधल्या ‘जैश’ च्या तळांवर हल्ला करण्यासाठी भारतीय वायु दलाने मिराज लढाऊ विमाने वापरली होती. या हल्ल्यात ‘जैश’चे अनेक अतिरेकी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर हवाई दलाचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे दहशतवाविरुद्धच्या मोहिमेला यश येणार, असा विश्‍वास सैन्यदलाला आहे. भारताचा हवाई हल्ला आणि भारत -पाक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही सैन्यदलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे युद्ध पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध नसून दहशतवादाविरोधात आहे, हे भारताने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य करून त्यावर हवाई हल्ले करण्याचा भारताचा पवित्रा आहे.
भारताने 26 फेब्रुवारीला केलेला हवाई हल्ला हा ‘पायलट प्रोजेक्ट’ होता. यापुढेही अशा आणखी मोहिमा आखल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. त्यानंतर भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मोदी यांनी गुजरातमध्ये बोलताना दहशतवाद्यांना ‘चून चून के मारेंगे’अशा शब्दांत आपली दिशा स्पष्ट केली आहे. एकीकडे पाकिस्तानवर दहशतवाद्यांवर कारवाईसाठी दबाव आणायचा आणि दुसरीकडे कारवाईसाठी जय्यत तयारी सुरू ठेवायची, अशा दोन्ही पातळ्यांवर भारत आता लढण्याची तयारी करीत आहे.