Breaking News

वारंवार खंडित होणारी इंटरनेट सुविधा सुरळीत करा अन्यथा ताला ठोको आंदोलन;शिवसंग्रामचा दूरसंचार विभागाला इशारा


देऊळगांव राजा,(प्रतिनिधी): तालुक्यात बीएसएनएलची इंटरनेट सुविधा म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी झाली आहे. देऊळगांव राजा तालुक्यातील बीएसएनएलची इंटरनेट सुविधा वारंवार खंडित होत असून ती तात्काळ सुरळीत करावी, अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीएसएनएल चे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी जे.एस.वाघ यांच्याकडे केली आहे. इंटरनेट सुविधा सुरळीत न झाल्यास बीएसएनएल कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.


मागील आठवड्यापासून देऊळगांव राजा तालुक्यातील बीएसएनएलचे नेटवर्क वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे नेटवर्कवरील कामे ठप्प झाली आहेत. दर दिवसाआड इंटरनेट बंद पडत असल्याने नागरीक संतप्त होत आहे. बीएसएनएलची इंटरनेट सुविधा बंद असल्याने शहरातील बँका, ऑनलाईन सेवा बंद आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे बँकेचे कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच नोकर भरतीचे अर्ज भरण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरळीत नासल्यामुळे बँकेचे कामकाज मागील आढवड्यापासून विस्कळीत झाले आहे. परिणामी शेतकरी, जेष्ठ नागरिक, पेंशनधारक, व्यापारी, तसेच पगारधारक यांना प्रचंड मासिक मनस्थाप सहन करावा लागत आहे. तसेच महसूल विभागाचे व खरेदी-विक्री विभागाचे इंटरनेट अभावी कामकाज बंद असल्याने शासनाचा रोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र बीएसएनएलच्या यंत्रणेत कवडीचीही सुधारणा होताना दिसत नाही.

याबाबत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेणे गरजेचे असून तालुक्यातील वारंवार बंद पडत असलेली बीएसएनएलची इंटरनेट सुविधा तात्काळ सुरळीत करावी, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर पठाण, अजमत पठाण, अरीफ पठाण, सुरेश निकाळजे, संतोष हिवाळे, विनोद खार्डे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.