Breaking News

सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा


सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने झेंडा रोवला असून तालुक्यातील सर्वात मोठ्या लिंब ग्रामपंचायतीवर सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या गटाने बाजी मारली. त्यांच्या अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने 17 पैकी 14 जागा व सरपंचपद काबीज केले. त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडाला. दरम्यान, लिंबसह सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने सातारा तालुक्यात सबकुछ राष्ट्रवादी असे वातावरण पहायला मिळाले. 

सातारा तालुक्यातील लिंब, पानमळेवाडी, टिटवेवाडी, देशमुखनगर, बोपोशी, कातवडी बुद्रूक व कासारस्थळ या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. मात्र, यामध्ये कासारस्थळ ही ग्रामपंचायत निवडणूक एकही अर्ज न आल्याने पुढे ढकलण्यात आली. तर कातवडी बु. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध केली. उर्वरित पाच ग्रामपंचायतीसाठी दि. 24 रोजी मतदान झाले होते. सातारा तालुक्यात 83.24 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. जसा जसा निकाल लागत होता तस तसा कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत होता. तर काही ठिकाणी हुरहुर लागून राहिली होती. 

तालुक्यातील संवेदनशील असलेल्या लिंब ग्रामपंचायतीसाठी अजिंक्य ग्रामविकास पॅनेल व अजिंक्य भैरवनाथ पॅनेल यांच्यात चुरशीने लढत झाली. यामध्ये अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत 17 पैकी तब्बल 14 जागांवर विजय मिळवला. तर सरपंचपदही काबीज केले. त्यामुळे लिंबवर अजिंक्य ग्रामविकास पॅनेलचा झेंडा रोवला गेला. सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत ऍड. अनिल सोनमळे यांना 3 हजार 322 मते पडली तर त्यांचे विरोधी उमेदवार राहुल सावंत यांना 1 हजार 995 मते पडली. यामध्ये ऍड. सोनमळे यांनी 1327 मतांच्या फरकाने निवडून आले. याचबरोबर सदस्य पदी दादा बरकडे (897), मानसिंग सावंत (880), रेश्मा निकम (681), रामदास सोनमळे (655), वंदना सावंत (643), सुबोध भोसले (490), उज्वला शिंदे (527), तुळसाबाई सरगर (465), घनश्याम सावंत (454), राहुल सावंत (419), सुमन सोनमळे (427), रवींद्र शिंदे (500), आशा धुमाळ (586), विमल सावंत (491) तर अजिंक्य भैरवनाथ पॅनेलचे महेश पाटील (680), सुनीता करंजे (675) व अनिता जाधव यांना 612 मते मिळाली. 

पानमळेवाडीत सरपंच व 9 सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यामध्ये दिलीप काळे व रेश्मा जाधव हे सदस्य बिनविरोध झाले होते. तर सरपंचपदासाठी विनोद शिंदे यांना 738 मते तर त्यांचे विरोधी सुभाष नलवडे यांना 638 मते मिळाली. त्यामुळे विनोद शिंदे यांनी 100 मतांच्या फरकाने निवडून आले. सदस्यपदी रवींद्र भोसले, किशोर बोराटे, आशा चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, वैशाली चव्हाण, प्रियंका चव्हाण, पुनम गोरे हे निवडून आले. टिटवेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी निवडणूक लागली होती. यातील तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. सरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या शिला सावंत यांना 365 मते मिळाली तर त्यांचे विरोधी उमेदवार पूनम गायकवाड यांना 197 मते मिळाली. त्यामुळे सावंत या 162 मतांच्या फरकाने निवडून आल्या. सदस्यपदी संजीवनी भोसले, किरण पवार, मीरा माने, राजकुमार चव्हाण हे निवडून आले. मतमोजणी दरम्यान, विरोधी पॅनेलने निकालावर शंका व्यक्त केल्याने फेर मतमोजणी करण्यात आली. 

देशमुखनगर ग्रामपंचायतीसाठी 7 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यातील दोन जागांवर उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या जागा रिक्त राहिल्या. सरपंचपदासाठी संपत देशमुख यांना 126 मते मिळाली तर दत्तात्र सावंत यांना 98 मते मिळाली. देशमुख यांनी अवघ्या 28 मतांनी विजय मिळवला. सदस्यपदी सोपान देशमुख, इंदूबाई देशमुख, सुनीता देशमुख, कमल देशमुख व हिरालाल देशमुख यांनी विजय मिळवला. बोपोशी ग्रामपंचायतीसाठी 7 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. एक जागा रिक्त राहिली. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत श्रीरंग पवार यांना 146 तर वसंत पवार यांना 134 मते मिळाली. श्रीरंग पवार यांनी 12 मतांच्या फरकाने विजय मिळवला.