Breaking News

साठवण बंधार्‍याचे भूमिपूजन अ‍ॅड. काकडे यांच्या हस्तेचापडगाव/प्रतिनिधी
लाडजळगाव गटाच्या जि.प.सदस्य हर्षदा काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या आखेगाव येथील सोपानवस्ती येथे साठवण बंधार्‍याचे भूमिपूजन अ‍ॅड.शिवाजी काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मुरलीधर नाचण होते. यावेळी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, जगन्नाथ दादा गावडे, भाऊसाहेब दारकुंडे, भाऊसाहेब मराठे, वसंत गव्हाणे, मा.तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, अंबादास जाधव, सिराजभाई शेख, शंकर काटे, अशोकराव उदागे, शिवाजी डमाळ, विष्णू डोंगरे, दत्तात्रय नाचण, रामकृष्ण कोल्हे, दत्तात्रय झिंजूर्के, नवनाथ खेडकर, अरुण खर्चन, सखाराम घावटे, कल्याण ससाने, शामराव निजवे, शिरसाठ महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, लोकशाहीत कामाचे महत्त्व कमी आहे. कामाची माणसे ही नेहमी पाठीमागेच राहतात. सामान्य माणसाची बांधिलकी आम्ही जपत आलो आहोत. आणि यापुढेही जपणार. निवडणुकीत दिलेला शब्द आम्ही पाळतो व आज तो या कामाच्या स्वरुपात पूर्ण करून दाखवला. काम होत असताना गावकर्‍यांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. कारण काम मंजूर करून आणणे हे आमचे काम आहे. परंतु ते काम पूर्ण करून घेणे हे तुमचे काम आहे. आज खूप वाईट स्वरूपाचा दुष्काळ आहे. आज शेतीवर अवलंबून राहणार्‍या शेतकर्‍यांनी आपली संख्या कमी केली पाहिजे. शेतीस पर्यायी व्यवस्था आपण शोधला पाहिजे. लोकांनी ते शोधलेत, असेही बोलताना ते म्हणाले.

काकडे बोलताना म्हणाल्या की, जिल्हा परिषद अंतर्गत निधी नसल्याने कामे करताना अडचणी येतात. काम मंजूर करताना खूप त्रास सहन करावा लागतो. परंतु या बंधार्‍यासाठी गावकर्‍यांकडून प्रचंड मागणी होती. त्यांच्या सहकार्‍यांने व प्रचंड मोठ्या पाठबळामुळेच मी हे काम मंजूर करून आणू शकले. आज ह्या कामाचे टेंडर ओपन झाले. टेंडर ओपन झाल्याशिवाय नारळ फोडायचे नाही, आणि नारळ फोडले तर ते काम चालू झालेच पाहिजे. ही आमच्या कामाची पद्धत आहे. नुसते पोतेभर नारळ फोडून पुढे जायचे हे काकडे यांच्या नियोजनात नाही. बर्‍याच बाकी पुढार्‍यांकडून उद्घाटनाच्या नावाखाली पोते-पोते नारळ फोडले जाते. परंतु कामाच्या नावाने त्याठिकाणी ठेंगाच पाहायला मिळतो. 14 वित्त आयोगाचा जि.प.कडे येणारा निधी व त्यातून वाड्या-वस्त्यांवरील होणारे रस्ते आता करणे अवघड झाले आहे. कारण आता हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे लाडजळगाव गट मोठा असल्याने या ठिकाणी कामे पण जास्त आहेत. व त्यासाठी मागण्यासुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. पण मी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी नेहमी तत्पर असते असेही त्या बोलताना म्हणाल्या.