Breaking News

काँग्रेसला आमचे विचार चालतात पण उमेदवारी नाही : प्रवीण गायकवाड

काँग्रेसकडे उर्मिला मातोंडकरच्या प्रवेशासाठी वेळ, पण माझ्यासाठी वेळ नसल्याची खंतपुणे : ‘काँग्रेस पक्षाकडून पुणे शहराच्या उमेदवारीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. या काँग्रेस पक्षाला आमचे विचार चालतात, पण आमची उमेदवारी चालत नाही. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली आहे. यापुढे काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करणार. मी गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम केले. परंतु, तरीदेखील उमेदवारी नाकारली, असे स्पष्ट मत प्रवीण गायकवाड यांनी गुरूवारी व्यक्त केले. पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गायकवाड बोलत होते.
‘काँग्रेसकडे उर्मिला मातोंडकरच्या प्रवेशासाठी वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही’, अशी खदखद काँग्रसचे गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून ख्याती असलेली उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. उर्मिला मातोंडकराच्या प्रवेशावर प्रविण गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. या उमेदवारीसाठी प्रविण गायकवाडांचे नाव स्पर्धेत आहे. परंतु, निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्यानंतरही काँग्रेसने निश्‍चितपणे उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे उमेदवारीची आशा धरुन बसलेले प्रविण गायकवाड काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज झाले आहेत. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे, शेकापच्या चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ अजुन संपलेला नाही. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव काँग्रेसने निश्‍चित केले असल्याचे बोलले जात आहे, पण त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. घोषणा अजुन होत नसली तरी स्वयंघोषीत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती. यातून अरविंद शिंदे यांचं नाव निश्‍चित झालं मात्र घोषणा अजुन झालेली नाही. तरी शिंदेंनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवातही केली आहे.लोकांच्या भेटीगाठी घेण आणि मान्यवरांना भेटणं शिंदे यांनी सुरू केलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची शिंदे यांनी भेट घेतली आणि चर्चा केली.

पुण्यात काँगे्रसच्या उमेदवाराचा तिढा

पुण्यात काँगे्रसकडून अद्याप उमेदवारांचे नाव जाहीर न केल्यामुळे, जागेचा तिढा कायम आहे. भाजपने प्रचाराला जोरात सुरुवातही केली आहे. भाजपने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केली. मात्र काँग्रेसचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात तिसर्‍या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव काँग्रेसने निश्‍चित केले असल्याचे बोलले जात आहे, पण त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही.तर दुसरे इच्छुक उमेदवार मोहन जोशी हेही प्रचाराला लागणार आहेत. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर तिसरे उमेदवार प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसच्या घोळाला कंटाळून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.