यू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून?



उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू

सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे आता वातावरणही चांगले तापले आहे. सुरूवातीला माढ्यातून उमेदवारीचे संकेत दिलेल्या माजी केंद्रिय मंत्री व माढ्याचे माजी खासदार शरद पवार यांनी ऐनवेळी माढा मतदारसंघातून लढणार नसल्याचे सांगितले. मात्र या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातून उठलेल्या प्रतिक्रिया व विरोधी पक्षांनी त्याचे केलेले भांडवल लक्षात घेऊन धक्कातंत्र वापरत यू टर्न घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे. सध्या लोकसभेच्या रणधुमाळीने इलेक्शन फीवर चांगलाच दाटल्याचे दिसून येत आहे. भाजप, सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. आघाडी आणि युतीचा घोळ अद्याप मिटला नसल्याने गनिमी कावा आणि नवनव्या समिकरणांचा विचार करीत काही जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात सर्वच पक्ष पुरेसी दक्षताही घेताना दिसत आहेत. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील माढ्यातून निवडणूक लढवलेल्या शरद पवार यांनी सन 1014 मध्ये मात्र माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि भाजपप्रणीत आघाडीतून शेतकरी नेते सदाभाउ खोत यांच्यावर मात करीत निवडूनही आणले. मूळातच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील संमिश्र वातावरणामुळे आणि विस्ताराने मोठे क्षेत्र असलेल्या या मतदारसंघाने राष्ट्रवादीची सलग पाठराखण केली. त्यामुळे एका दृष्टीने हा राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पंतप्रधानपदासाठीच्या साखरपेरणीकरीता माढा मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. मात्र ऐनवेळी श्री. पवार यांनी निवडणूक लढायला अचानक नकार दिल्याने पेच वाढला आहे. राष्ट्रवादीअंतर्गत शह काटशहाचे राजकारण थांबवण्यासाठी आपण स्वत:च या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहात असल्याचे वातावरण पवारांनी तयार केले होते. नंतर कौटुंबिक कारण आणि एकाच घरातील तीन उमेदवार नकोत म्हणून त्यांनी माघार घेत असल्याचेही जाहीर केले. दरम्यान विद्यमान खासदारांचे सुपूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाशी जवळीक साधली आहे. तर संजयमामा शिंदे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी लोकसभेला लढण्याची तयारी केली नसल्याचे सांगितले असले तरी त्या दोघांनीही हालचाली करुन पक्षनेतृत्त्वावर दबाव वाढवला आहे. मोहिते-पाटलांना उमेदवारी दिली तर अंतर्गत हेवेदाव्यांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे पवारांना चांगलेच माहित आहे. भाजपानेही या परिस्थितीचे आकलन केले आहे. त्यामुळे मोहितेंचे दबावतंत्र कितपत यशस्वी होतेय हे उद्यापर्यंत समजणार आहे. राष्ट्रवादीला मोहितेंना तिकीट द्यावे लागले तर विरोधी गट चांगलाच सरसावणार आहे. भाजपाकडून लढले तरी परिचारक आणि आमदार भालकेंची थोडीफार साथ निवडणुकीत यश मिळवून देण्यात पुरेशी ठरणार नाही. मोहिते नसतील तर राष्ट्रवादीला संजय मामांना गळ घालावी लागणार आहे. भाजपाकडून मंत्री सुभाषराव देशमुखांनीही पक्षांतर्गत कुरबुरींचा धसका घेऊन निवडणूकीतून माघार घेतली आहे. पालकमंत्री विजय देशमुखांचा गट साथ देणार नाही हे जाणवल्यानेच त्यांनी संथ भूमिका घेतली आहे. रणजितसिंह मोहिते आणि संजयमामा शिंदे या दोन पर्यायांचीही चाचपणी भाजपाने केली आहे. एकूणच माढ्यात राष्ट्रवादी आणि भाजपासमोरही उमेदवारीवरुन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा ससपेन्स थ्रीलर दिग्दर्शक शरद पवारांनीच तयार केल्याचे जाणवत आहे. परिस्थिती त्यांना हवी तशी तयार होत आहे. मोहितेंची कोलांटी झाल्यानंतर राष्ट्रवादी ससपेन्स थ्रीलरचा उलगडा करण्याची शक्यता आहे. नाईलाज झाल्याचे सांगून शरद पवारच निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. माढ्याची जागा राष्ट्रवादी आणि भाजपाकडूनही प्रतिष्ठेची केली गेली आहे. राष्ट्रवादीला तर बालेकिल्ल्यातील ही जागा राखावीच लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत. शरद पवारांनी अगोदर माढ्यातून उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा राष्ट्रवादीअंतर्गत परिस्थिती आलबेल होती. त्यांनी माघार घेतल्यानंतर मात्र चित्र पालटले आहे. राष्ट्रवादीचे मणी विस्कटण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे माढ्यातून आता श्री. पवार यांनीच लढावे, अशी मागणी माण आणि खटाव तालुक्यातून होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात माढा व मावळ या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नाही. मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीर व्हायला हवे होते. तसे न झाल्याने पवार पुन्हा माढ्यातून उतरण्याची शक्यता वाढली आहे. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पवारांना तुम्हीच लढले पाहिजे, अशी गळ घातली आहे. त्यामुळे पवारांनी यू टर्न घेत पुन्हा माढ्यातून उतरण्याची शक्यता वाढली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget