कर्जत तालुक्यात वन्यजीवांची तस्करी जोरात


निर्ढावलेल्या वनविभागाला येईना जाग ; हरीण, काळविटांचे जीवन धोक्यात
भाग : 2
कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या रेहेकुरी अभयारण्यासह तालुक्याच्या पश्‍चिम भागातील धालवडी, कोपर्डी, राक्षसवाडी, दगडी बारडगाव, तळवडी आदी भागातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची तस्करी सुरू आहे. वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. वनक्षेत्रात शिकारी लोकांचा वावर वाढला असून मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची तस्करी होत आहे.
हरीण, काळवीट, ससे, घोरपड या बरोबरच चतुरपक्षी, पारवे, कबूतर अशा बहुविध पक्षांचा यात समावेश आहे. मात्र, प्राणी तसेच पक्षांच्या तस्करीने या भागातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. रात्री सात वाजेनंतर शिकारी जंगलात बॅटर्‍या घेवून फिरत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळते. मोठमोठ्या जाळ्यांचा वापर करून तसेच फासे लावून वन्यप्राण्यांना त्यामध्ये अडकवून शिकार केली जात आहे. वनक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडीने जंगले विरळ झाली आहेत. आश्रयाच्या अभावामुळे वन्यजीवांना आपला जीव वाचवणे कठीण होऊन बसले असून त्यांना जीवाला मुकावे लागत आहे.
अनेकदा वन्यप्राण्यांचे कळप लोकवस्तीत आढळून येतात. उन्हाळ्यामुळे वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात लोकवस्तीत घुसण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेक हरीण-काळविटांचे रस्ता अपघात घडतात. डोळे दिपविणार्‍या प्रकाश बॅटर्‍यांचा उपयोग करून प्राण्यांना यामध्ये चकवले जाते. शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचेही मोठे नुकसान या तस्करांकडून केले जात आहे.
तस्करीसाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा देखील वापर होत असल्याने या तस्करांना रोखण्याचे वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांसमोर आव्हान आहे. शिकारीमुळे या भागातील वन्यजीवांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. भटकंती करणार्‍या लोकांकडून लगोरीच्या सहाय्याने चतुर, पारवे, मोर, लांडोर तसेच इतर जातींच्या रंगीबेरंगी पक्षांची तस्करी करून हे पक्षी नामशेष करण्याचे प्रकार होत आहेत. प्रशासन व वनविभागाने वन्यजीवांच्या संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी देत आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
वृक्षतोड, तस्करी वाढली
कुळधरण भागातील जंगलात वृक्षतोड व वन्य प्राण्यांची तस्करी वाढली आहे. जंगलातून मोठे रस्ते पडले असून त्यातून चारचाकी वाहने सर्रासपणे जात आहेत. त्यामुळे शिकारी करणार्‍यांसाठी ते सोयीस्कर ठरत आहे. मोतीरा जंगलातील म्हसोबा मंदिराजवळचा पाणवठा कधीही भरण्यात येत नाही. या भागात वृक्षतोडीने जंगल विरळ झाले आहे. वन विभागातील अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - कुमार जगताप
कुळधरण, ता.कर्जत

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget