Breaking News

..अखेर सातार्‍यात पुन्हा मनोमिलनाचा प्रयोग; उदयनराजेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब


सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) मुंबईत पक्षातील जबाबदार प्रमुख पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजेंचे मनोमीलन झाले आणि सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला.

बैठकी दरम्यान, एकदिलाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे लोकसभेला राष्ट्रवादीचे सर्व आमदार खा. उदयनराजे यांचे काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दोन वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेत खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचे मनोमीलन तुटल्यानंतर दोन्ही राजांमध्ये वितुष्ट आले होते. यानंतर बर्‌याच घटना घडल्या. यामुळे त्यांच्यात आणखी दुरावा आला होता. मात्र, त्यांनतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे गटाचा विरोध, आ. शिवेंदराजे यांची ना. नरेंद्र पाटलांसोबत झालेली राजकीय मिसळ तसेच उदयनराजेंव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवाराची मागणी यामुळे सातारा लोकसभेला कुणाला तिकीट मिळणार? याबाबत सातारकरांना उत्सुकता लागली होती.

आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शनिवारी मुंबईत खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये खा. पवार यांना दोन्ही राजांचे मनोमीलन करण्यात यश आले आहे. यावेळी खा. पवार यांनी पदाधिकार्‍यांना सर्व वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार हे खा. उदयनराजे यांना लोकसभेचे काम करणार आहेत