Breaking News

‘आप’च्या आमदार अलका लांबा काँग्रेसमध्ये?


Image result for ‘आप’च्या आमदार अलका लांबा काँग्रेसमध्ये?

नवीदिल्लीः दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघाच्या ‘आप’च्या आमदार अल्का लांबा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. लांबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवासी होण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

लांबा यांनी केलेल्या ट्विटमुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे. 5 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये भाजपला हरवण्यासाठी मी काँग्रेसबरोबर असलेले माझे 20 वर्षांचे नाते तोडले होते. दिल्लीत भाजप निवडणूक हरली. आता जेव्हा भाजपला देशभर हरवण्याची वेळ आली आहे, तेव्हा पाच वर्षांची साथ सोडणे कसे कठीण राहील?’ असे ट्विट त्यांनी केले आहे. शिवाय, माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, की काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही; परंतु असा प्रस्ताव आल्यास मला आनंद होईल. मी पक्षासाठी माझ्या आयुष्यातील 20 वर्षे दिली आहेत. मला पक्षात बोलावायचे किंवा नाही हा निर्णय काँग्रेस घेईल.

अल्का लांबा यांनी अधिकृतरित्या ‘आप’ सोडत असल्याचे मात्र जाहीर केलेले नाही.

2013 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘आप’मध्ये प्रवेश केला. ‘आप’तर्फे त्या चांदणी चौक मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या; परंतु पक्षातील काही धोरणांबाबत त्यांचे वरिष्ठांशी मतभेद होऊ लागले. डिसेंबर 2018 मध्ये अल्का यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी करावी, असा ‘आप’कडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी तसे न करण्याचे ठरवले तर ‘आप’कडून राजीनामा मागण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला होता.