Breaking News

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पाणवठे कोरडे,वृक्षतोडीत वाढ,वन्यजीव सैरभैर


कर्जत / प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील रेहेकूरी, राक्षसवाडी,कोपर्डी,धालवडी,दूरगाव,गुंडाचीवाडी आदी भागातील वनक्षेत्रात होत असलेल्या वृक्षतोडीने जंगले भकास झाली आहेत. विरळ झालेल्या जंगलामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. वन्य प्राण्यांसाठी बांधलेल्या पाणवठ्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी भरले जात नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ सैरभैर झाले आहेत. पाण्याच्या शोधात भटकंती करताना या वनक्षेत्रात अनेक हरणे तसेच काळविटांचा मृत्यू झालेला आहे.

कर्जत तालुक्यात मोठे वनक्षेत्र आहे.मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे येथील जंगलात मोठया प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे.जंगलात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने झाडा-झुडपांची वाट लागली आहे.वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्याने हे प्राणी आडोसा शोधताना दिसतात.चारा पाण्याच्या शोधात हरिण,काळविटे शेतात येतात व त्यांची शिकार साधली जाते. उन्हाच्या झळांनी व्याकूळ झालेली हरणे,काळविटे,ससे,लांडगे, कोल्हे आदी प्राणी उजाड माळरानावर सैरभैर धावताना दिसतात.पुरेशा पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे.तसेच पाणी नसल्याने या वन्यप्रांण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

वनक्षेत्रात अनेक ठिकाणी पाणवठे बांधण्यात आलेले आहेत. पाणवठ्याजवळ नियमित पाणीपुरवठ्यासाठी हातपंप बसवण्यात आले आहेत. मात्र वनमजुरांच्या दुर्लक्षामुळे पाणवठे कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

◾ वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कुळधरण तसेच रेहेकुरी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वनक्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. वनक्षेत्रात दिवसाढवळ्या शिकारी होत आहेत.वनक्षेत्रात ठिकठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. १२ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे सुरू नाहीत. मात्र या भागात पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे याची जिल्हा तसेच नाशिक विभागीय अधिकाऱ्यांनी दाखल घ्यावी.अन्यथा या प्रकारावर आवाज उठवावा लागेल.

- सुधीर जगताप
सामाजिक कार्यकर्ते,कुळधरण