Breaking News

संधी मिळाल्यास भारतात परत येऊ : रघुराम राजन


नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा विजय झाल्यास माजी गव्हर्नर रघुराम राजन हे केंद्रीय अर्थमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना, भारतात संधी मिळाल्यास आपण परत येऊ, असे राजन यांनी म्हटले आहे. ते ’थर्ड पिलर’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभानंतर पत्रकारांशी बोलत होते. 

सध्या जिथे आहे, तिथे मी खूप आनंदी आहे, मात्र नव्या संधीसाठी तयार असल्याचेही रघुराम राजन यांनी यावेळी स्पष्ट केले.राजन सध्या शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारतात सरकारी अथवा राजकीय क्षेत्रात संधी मिळाली तर परतणार का, असा प्रश्‍न माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारला होता.किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना काँग्रेस पक्षाने तयार केली आहे. त्यासाठी रघुराम राजन यांची मदत घेण्यात आल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. या योजनेत गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये व मासिक 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी मदत केली का, असे विचारले असता त्यांनी चर्चा करणे घाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की खरोखर ही भारतासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. 

आपल्या नव्या सुधारणा करण्याची गरज आहे. जे कोणी ऐकण्यासाठी तयार असेल तर त्यांच्यासाठी या कल्पना पुढे नेताना आनंद वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. मात्र सत्तेत असलेल्या भाजप सरकारने त्यांना पुनर्मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.