Breaking News

शिवसेना-भाजप युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर; सत्तेसाठी नाही, तर विचारांसाठी युतीअमरावती / प्रतिनिधीः
शिवसेना-भाजप युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे. तोडण्याचा प्रयत्न केला, तरी तुटणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती अभेद असल्याची ग्वाही दिली. ही युती केवळ सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची आहे, असे ते म्हणाले.

युती झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनेेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अमरावती पहिलीच संयुक्त सभा झाली. त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की आम्हाला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व राष्ट्रसाठी आहे.

सत्तेकरता युती झालेली नाही, असे सांगताना भविष्यात युती अशीच टिकणार असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती झाल्यानंतर काहीजणांनी माघार घेतली, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचे नाही असे त्यांनी सांगितले.

या वेळी ठाकरे यांनी पक्षात नव्याने प्रवेश करणार्‍यांना चिमटा काढला. आजकाल कोणावर टीका करायची भीती वाटते. उद्या तो भाजप नाहीतर शिवसेनेत असायचा असे ते मिश्कील शैलीत म्हणाले. शरद पवारांना भाजपत घेऊ नका असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडे तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले, तर बोलायचं कोणावर असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

या वेळी ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही, असे सांगताना ठाकरे यांनी मोदी यांचेही कौतुक केले. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.

मनातल्या आणि म्यानातल्या तलवारी

काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून उघड तलवारी काढल्या होत्या. काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खर्‍या तलवारी काढून मैदानात उतरा असे आवाहन या वेळी ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी मनातून आणि म्यानातून तलवारी काढल्या आहेत, असे ते म्हणाले. शिवसेना भाजप जनतेची शेवटची अपेक्षा असून आम्ही गेलो तर अंधार पसरेल असे सांगत सर्वसमान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही असे त्यांनी सांगितले.