Breaking News

एक कोटीच्या फसवणुकप्रकरणी सातार्‍यात तिघांवर गुन्हा दाखल


सातारा / प्रतिनिधी : जमिनीची खोटी कागदपत्रे देऊन त्याच्या आधारे वाहन कर्ज घेतल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी सातारा सहकारी बँकेची एक कोटी रुपयांची फसवणूक केली असून बँकेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. संदीप भीमराव पाटील (रा. मलकापूर रोड, कराड. मूळ रा. गोटखिंडी, ता. वाळवा), अझीम सलीम पठाण (रा. बाजारपेठ, रहिमतपूर), मनोज जगन्नाथ पवार (रा. एपीएमसी मसाला मार्केट, वाशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सातार्‍यात पोवई नाका परिसरात सातारा सहकारी बँकेची शाखा असून त्याठिकाणी व्यवस्थापक म्हणून पांडूरंग दगडू लोहार (रा. सानपाडा, मुंबई) हे कार्यरत आहेत. या बँकेचे मनोज पवार हे खातेदार आहेत. शाखेत कार्यरत असताना दि. 3 नोव्हेंबर 2016 रोजी मनोज पवार हा शाखेत गेला. त्यावेळी त्यांच्यासोबत दोनजण होते. पवार यांनी व्यवस्थापक लोहार यांची भेट घेत सोबत असणार्‍यांची नावे संदीप पाटील आणि अझीम पठाण असल्याचे सांगितले. त्या दोघांना वाहतूक व्यवसायासाठी ट्रक घ्यावयाचे असल्याचे सांगून 48 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. कागदपत्रे पाहून बँकेने 42 लाखांचे कर्ज दिले. कर्ज देत असताना व्यवस्थापक लोहार यांनी वाहनांबरोबरच जमीन तारण देण्यास सांगितले. त्यानुसार त्या तिघांनी भडकंबे येथील जमिनीचे सातबारा उतारे आणि फेरफार बँकेत जमा केले. त्या तिघांनी पुन्हा बँकेशी संपर्क साधत व्यवसायासाठी आणखी कर्ज आवश्यक असल्याचे लोहार यांना सांगितले. या कर्जासाठी त्यांनी वापरात असणारे दोन जुने ट्रक तारण दिले. त्यानुसार बँकेने ट्रकच्या कागदपत्रांवर आरटीओ कार्यालयात त्यासाठीचा बोजा चढवला. कर्ज घेतल्यानंतरच्या काळात त्यांनी हप्ते भरण्याचे टाळले. कर्ज थकल्यानंतर बँकेने वाहन तसेच तारण दिलेली जमीन जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेदरम्यान बँकेने भडकंबे येथील तलाठ्यास तारण दिलेल्या जमिनीचा तपशील असणारी नोटीस देत त्या जमिनीवर बँकेच्या नावाची नोंद करण्यास सांगितले. नोटीस बजावूनही कार्यवाही होत नसल्याने बँकेने माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी त्यांना कर्जासाठी जोडलेले उतारे व फेरफार तसेच संबंधित व्यक्ती त्या गावच्या रहिवासी नसल्याचे समोर आले. त्या तिघांनी बनावट कागदपत्रे सादर करत बँकेची फसवणूक केल्याची तक्रार लोहार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार करीत आहेत.