Breaking News

राळेगण थेरपाळ येथे तरुणावर प्राणघातक हल्ला


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील किरण भगवान कारखिले व त्याचा चुलत भाऊ पंकज कारखिले यांच्यावर गावातील विकास फक्कड पवार यांच्यासह सहा ते सात जणांनी पिस्तुल, तलवार, कोयता, दगड, काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात दोघे गंभीर जखमी झाले आहे. तसेच या दरम्यान कारखेले यांच्या कार मधील एक लाख सहा हजार रुपये लंपास केले अशी फिर्याद किरण कारखिले यांनी पारनेर पोलिसांकडे दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील किरण भगवान कारखिले व पंकज कारखिले यांच्यावर तलवारीने हल्ला करुण जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी दि.14 रोजी रात्री नऊ वाजता झाली. फिर्यादीमध्ये किरण कारखिले यांनी म्हटले आहे की, राळेगण थेरपाळ येथील सबस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये चुलत भाऊ पंकज व मी बसलो होतो. त्यावेळी विकास पवार व त्याचे साथीदार गाड्या फोडीत होते. त्यामध्ये माझ्या मालकीची स्विफ्ट एम.एच 12 क्यू एफ 6135 या तसेच अन्य दुचाकी होत्या. या बाबत त्यांना विचारणा केली असता आम्हला ही मारहान केली. हा गोंधळ पाहूण जवळ असलेल्या दुकानदारांनी लगेच दुकाने बंद केली. 

याच वेळी विकास पवार याने व त्याच्या साथीदारांनी माझ्या गाडीतील महिला बचत गटाचे ठेवलेले एक लाख सहा हजार रुपयांची रक्कम घेऊन स्कोडा गाडी नंबर एम एच 12 एम डब्ल्यू 6763 मध्ये बसून तसेच इतर दुचाकी घेऊन पळून गेले. हा सर्व प्रकार पारनेर पोलिसांना कळवला. त्यांनी आम्हास नगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस तपास सुरू आहे.