Breaking News

स्वाभिमानीचे कराडला आजपासून बेमुदत उपोषण


कराड, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होऊन 4 ते 5 महिने पुर्ण झालेले आहेत. परंतु अद्याप जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या गळीत केलेल्या ऊसासाठी एक रक्कमी एफआरपीची रक्कम अदा करावी, याबाबतचे आदेश साखर आयुक्त पुणे यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. 

परंतु सदर आदेशाला जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात थकीत एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी आदेश द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवार, दि. चार मार्चपासून तहसिलदार कार्यालयसमोर थकीत एकरक्कमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 
 
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालु हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसापोटी 14 दिवसात एफआरपपी प्रमाणे होणारी रक्कम अदा करावी, तसेच विहित मुदतीत एफआरपी प्रमाणे ऊस बिल न दिल्यास विलंब कालावधी करीता 15 टक्के व्याज शेतकर्‍यांना देण्याची तरतुद आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तसे आदेश दिले आहेत. परंतु सदर आदेशाला जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी केराची टोपली दाखवून एफआरपीच्या 70 ते 85 टक्के रक्कम म्हणजेच 2200 ते 2500 रुपये शेतकर्‍यांना दिले आहेत.

खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एफआरपीची थकित रक्कम मिळावी, म्हणून 22 फेब्रुवारी रोजी सर्व कारखान्यांना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतू 10 दिवसाची मुदत संपत येत असून अजून ही कोणत्याही कारखान्यांनी थकीत एफआरपी दिलेली नाही.