Breaking News

क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : डॉ.कांबळे


 बुलडाणा,(प्रतिनिधी): सन 2025 पर्यंत क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी समन्वयातून प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी केले जागतिक क्षयरोग दिन निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथून क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होत. रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे व डॉ.गायकी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी डॉ.गोफणे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव व चव्हाण यांची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या रॅली मध्ये शासकीय नर्सिंग स्कूल, डॉ. पंकज लद्धड फार्मसी कॉलेज , ज्ञानदीप नर्सिंग स्कूल, वननेस नर्सिंग स्कूल, जिजामाता नर्सिंग स्कूल, आनंदी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. रॅली दरम्यान शहरातील प्रमुख चौकामध्ये शासकीय नर्सिंग स्कूल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथक नाट्य सादर केले. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रम शिवाजी सभागृह येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणार्‍या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र पत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रांगोळी स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक वननेस नर्सिंग स्कूल येथील मध्यमा मानकर, द्वितीय क्रमांक शासकीय नर्सिंग स्कूल येथील शालिनी सोसे, तृतीय क्रमांक ज्ञानदीप नर्सिंग स्कूल संगीता हांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच याच दिवशी निबंध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शासकीय नर्सिंग स्कूल येथील लक्ष्मी इंगळे, द्वितीय क्रमांक शासकीय नर्सिंग स्कूलची प्रज्ञा खरे, तृतीय क्रमांक शासकीय नर्सिंग स्कूलची अंजील सुरडकर यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद जाधव यांनी तर सूत्र संचालन चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान व आभार प्रदर्शन औषध निर्माण अधिकारी संजय उन्द्रीकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.