हेळगांव ग्रामस्थांचा चक्री उपोषणाचा इशारामसूर /प्रतिनिधी : हेळगाव (ता. कराड) येथील माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमताने पाणीपुरवठ्याच्या 580 लोखंडी पाईप्सची परस्पर विक्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. शासन स्तरावर त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई होत नसून दोषींना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे ही बाब गंभीर आहे, असा आरोप करून मार्चअखेरपर्यंत त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास कराडच्या गटविकास अधिकार्‍यांच्या दालनासमोर चक्री उपोषणास बसण्याचा इशारा हेळगाव ग्रामस्थांनी दिला.
मसूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत माजी पंचायत समिती सदस्य अशोक संकपाळ, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, चेअरमन अशोक चव्हाण, धीरज पाटील, अभय सूर्यवंशी, सुभाष कदम, कौस्तुभ सूर्यवंशी, शिवाजी जगदाळे, शामराव सूर्यवंशी, प्रल्हाद सूर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, माजी मंत्री शामराव अष्टेकर यांनी हेळगावला पाणीपुरवठा करण्यासाठी कालगाव येथील कृष्णा नदीवरून हेळगावला पाणीपुरवठा करण्यासाठी दुष्काळी पाणीपुरवठा योजनेतून पाइपलाइन मंजूर केली होती. कालांतराने स्वतंत्र पाणीपुरवठ्याची सोय झाल्याने, त्या जुन्या पाईपलाईन तशाच पडून होत्या. सन 2015 मध्ये तत्कालीन सरपंच सचिन देशमाने, उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमताने अंदाजे 580 लोखंडी 20 फुटाच्या अडीच इंची पाईपा काढून, कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीशिवाय परस्पर विक्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सदरची रक्कम शासकीय निधीत जमा दिसून येत नाही, ही बाब ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये उघडकीस आणून दिली. त्यावेळी सत्ताधार्‍यांनी पदाचा गैरवापर करून ग्रामसभेतच अरेरावीची भाषा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आम्ही जिल्हा परिषदेकडे रितसर दाद मागून ही वस्तुस्थिती उघडकीस आणून दिली. या प्रकरणी चौकशी होऊन आमच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत संबंधित दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत तीन सप्टेंबर 2018 रोजी कराडच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्रान्वये आदेश दिले होते. तथापि गटविकास अधिकारी व टीपीओ यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात चुकीचे व दिशाभूल करणारे पत्र दिल्याने त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. शासकीय मालमत्तेचे कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय संगनमताने मालमत्तेची परस्पर विक्री करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणे ही बाब गंभीर असून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करावी.
सदर तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थांनी चक्री उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, गटविकास अधिकारी कराड, उंब्रज पोलीस आदींना पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget