Breaking News

‘जैश’चा म्होरक्या मसूद ठार? सर्जिकल स्ट्राईकमध्ये झाला होता जखमी; पाकिस्तानकडून दुजोरा नाही


नवीदिल्ली, इस्लामाबादः पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार दोन मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरैशी यांनी म्हटले होते, की माझ्या माहितीप्रमाणे मसूद खूपच आजारी आहे. तो इतका आजारी आहे, की तो आपल्या घरातूनही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे या वृत्ताची आता बरीच चर्चा होत आहे. मसूद हा भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी होता. त्याच्यावर पठाणकोट एअर बेसवर दहशतवादी हल्ल्याचा आरोप आहे. भारतासह अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी अजहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती; मात्र चीन या मार्गात अडथळा आणत होता.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनआयए) माहितीनुसार, पंजाबमधील पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात मसूदचा हात आहे. त्याच्या ‘जैश’ या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता, या हल्ल्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनने घेतली होती. यामध्ये 40 जवान हुतात्मा झाले होते. मसूद अजहरच्या ‘जैश’ने गेल्या दोन दशकात भारतावर अनेकदा हल्ले केले आहेत. यांपैकी 2001 मध्ये संसद भवनावर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार आहे. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट एअर बेस हल्ला, त्यानंतर याच वर्षी पुलवामात केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये मसूदचाच हात आहे. दरम्यान, शनिवारी मसूदचा भाऊ अम्मार याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला. त्यामध्ये त्याने त्यांच्या ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केल्याचे म्हटले आहे. भारतीय विमानांनी त्या ठिकाणी हल्ले केले, जिथे ‘जैश’ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असे. पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या हल्ल्यामध्येच मसूद अजहर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होते. त्यानंतर तो रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान, 2 मार्च 2019 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानमधील माध्यमांतील वृत्तामध्येही म्हटले आहे. मसूद अजहर अनेक काळापासून किडनी आणि यकृतच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मौलाना मसूद अजहरच्या मृत्यूच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. देशभरातील माध्यमांनी याबाबत दावा केला असला, तरी अद्याप याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

मसूद अझहरला ‘अल कैदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या अत्यंत विश्‍वासू साथीदारांच्या गटातील होता. आफ्रिकन देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना चिथावणी देण्याचे कामही त्याने केले आहे. त्याला पाकिस्तानी धर्मगुरू म्हणूनही ओळखले जाते.

मसूदच्य मृत्यूची अफवा?
मसूदचा 2 मार्च रोजी मृत्यू झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे; परंतु त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र भारताच्या हवाई हल्ल्यावेळी मसूद बालाकोटमध्ये होता. त्यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे त्याचा किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान ही अफवा जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोप केला जात आहे.