Breaking News

राफेल असते, तर शत्रूचे एकही विमान वाचले नसते - मोदी


जामनगर (गुजरात)- ‘एअर स्ट्राइक’वरून प्रश्‍न विचारणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला आहे. दहशतवाद संपावा, ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे; मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्‍वास नाही, अशा शब्दांमध्ये मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. हवाई हल्ल्याच्या वेळी आपल्याकडे राफेल विमान असते, तर आपले एकही विमान कोसळले नसते आणि त्याचें एकही विमान वाचले नसते, असे म्हणत मोदी यांनी राफेल करारासाठी काँग्रेसने प्रचंड वेळ घालवल्याची टीका केली.

मोदी यांनी जामनगरमधील त्यांच्या सभेत पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतले. भारताला उद्ध्वस्त करण्याचा मानस बाळगणार्‍यांना हा देश सोडणार नाही, अशा शब्दांमध्ये मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ‘दहशतवाद हा आजार आहे आणि आम्ही त्या आजाराच्या मुळावर घाव घालत आहोत. शेजारचा देश दहशतवादाचे मूळ आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाचा मुळापासून निपटारा करत आहोत,’ असे मोदी म्हणाले. या वेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांचा सैन्यावर विश्‍वास नाही; मात्र आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले.


या वेळी पंतप्रधानांनी राफेल विमानाचा मुद्दादेखील उपस्थित केला. आज आपल्या हवाई दलाकडे राफेल असते, तर आपले एकही विमान जमीनदोस्त झाले नसते आणि त्यांचे (पाकिस्तानचे) एकही विमान वाचलं नसते, असे मोदी म्हणाले. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे. दहशतवाद संपवणे हेच आमचे ध्येय आहे; मात्र त्यांना केवळ मोदी यांना संपवायचे आहे, अशी टीका त्यांनी केली.