Breaking News

तटकरे, सुळे, महाडिक, उदयनराजेंना उमेदवारी; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; नगर, माढा, मावळची यादी दोन दिवसांत


मुंबई / प्रतिनिधीः
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, सातार्‍यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; मात्र माढा, मावळ आणि नगरमधील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे या जागांबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 12 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, सातार्‍यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, रायगडमधून सुनील तटकरे, परभणीतून राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे, जळगावमधून गुलाबराव देवकर, बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे आणि लक्षद्वीपमधून मोहम्मद फैजल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. उरलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर फेरफार होणार आहे. त्याबाबत बोलणे सुरू असून एक-दोन दिवसांत तो प्रश्‍नही निकाली निघेल, असे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही. नगरची जागा सोडणे शक्य होणार नसल्याचे आम्ही आधीच काँग्रेसला सांगितले होते, असे सांगतानाच नगरमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मानणारे आम्हाला पाठिंबा देतील, असा टोला त्यांनी लगावला.
चौकट
पार्थबाबत सस्पेन्स
ःःःःःःःःःःःः.


या वेळी पाटील यांना पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍न विचारण्यात आला, तेव्हा कोणती जागा केव्हा जाहीर करायची याचा अधिकार आमचा आहे, असे सांगून पाटील यांनी मावळबाबत सस्पेन्स कायम ठेवला.