Breaking News

किती दहशतवादी मारले, याची मोजदाद नाही; हवाई दल प्रमुखांचे स्पष्टीकरण; अचूक टार्गेटवर हल्ला


कोईमतूर : पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात ‘जैश-ए- मोहम्मद’चा तळ उद्ध्वस्त केला. या हल्ल्यात सुमारे 350 दहशतवादी मारले गेल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी, बालाकोट येथील हल्ल्यात 250 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले असल्याचा दावा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रथमच एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आम्ही टार्गेटवर मारा केला; मात्र बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले हे आम्ही मोजले नाही. ज्या टार्गेटवर आम्ही हल्ला केला; तिथे कितीजण होते, त्यावर मृतांचा आकडा अवलंबून आहे. टार्गेटवर मारा करणे आणि ते अचूक भेदले आहे की नाही, हे पाहणे आमचे काम आहे, असे धनोवा यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादी तळाला टार्गेट केल्याप्रकरणी परराष्ट्र सचिवांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते, की आम्ही टार्गेट भेदले. जर आम्ही बॉम्ब जंगलात टाकले असते, तर पाकिस्तानला उत्तर देण्याची काय गरज होती, असा सवाल धनोवा यांनी केला आहे.

मिग-21 बायसन विमानाचा वापर का केला, यावर उत्तर देताना हवाई दल प्रमुखांनी म्हटले आहे की, हे अत्याधुनिक विमान असून त्यात काळानुसार सुधारणा केली आहे. ते रडार, हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. आम्ही आमच्याकडील सर्व विमानांचा वापर करणार आहोत. पाकच्या तावडीतून लढवय्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरूप परत आल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच आता राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत धानोआ यांनी माहिती दिली आहे. राफेल ही लढाऊ विमाने साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यंत दाखल होतील, असे धानोआ यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या वादानंतर राफेल विमानं भारतात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमचेच सरकार राफेल उडवणार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत बोलताना आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असे सांगितले. राफेल विमान प्रकरणावरून काँग्रेसला टार्गेट करताना हे लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली, तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.