Breaking News

एल्गार मोर्चातून रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवू : गायकवाड


वडूज/ प्रतिनिधी : रिपब्लिकन पक्षातर्फे सातार्‍यात शुक्रवार, दि.15 रोजी होत असलेल्या एल्गार मोर्चात बहुजन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व बहुजनांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या मोर्चाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद दाखवून द्या असे आवाहन रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केले.

खटाव माण तालुक्यातील रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथे झाला. त्यावेळी श्री. गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा युथचे अध्यक्ष जयवंत वीरकायदे, तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना सरतापे, नितीन भोसले, विठ्ठल नलवडे, अजित कंठे, मारूती घाडगे, अक्षय सरतापे, सुषमा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. गायकवाड म्हणाले, बहुजन समाजावर आजवर नेहमीच अन्याय, अत्याचार होत आले आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रिपाईच्यावतीने सातारा येथे एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. बहुजन समाजावर झालेल्या विविध अन्यायांच्या प्रकारांबाबत या मोर्चाच्या माध्यमातून सामूहिकरित्या जाब विचारला जाणार आहे. प्रामुख्याने भिमाई स्मारक निधीची घोषणा करण्यासाठी सरकारला जाब विचारणे, संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेणार्‍या सरकारने भीमा - कोरेगावप्रकरणी आंदोलनकर्त्या भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, खासगी डॉक्टरांवर कोणत्याही दरपत्रक, सोयी, सुविधा पद्धतीचा निर्बंध नाही याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती गठीत करून त्यावर नियंत्रण ठेवावे आदी प्रमुख मागण्यांचा जाब यावेळी विचारला जाणार आहे.

यावेळी जगदीश माने, राजेंद्र भोसले, विजय कंठे, मयुर कांबळे, रणजित कांबळे, प्रितम कांबळे, ऋषिकेश झोडगे, बाळू वाघमारे, किशोर खरात, संजय शिरतोडे, मारूती नलवडे, गौतम गायकवाड, बापुसाहेब घाडगे, हनुमंत गायकवाड, आनंदा गायकवाड, गणेश रायबोळे, कुमार गायकवाड, कासम लाडखान, सिद्धार्थ लोंढे, निखील सरतापे, अजय रायबोळे, प्रियांका भंडारे, सुमन सावंत, काजल तोरणे, माधुरी तोरणे, राजश्री शिंदे, शोभा निकाळजे, रेश्मा खरात, कविता खरात, प्रतिक्षा गायकवाड, रेखा गायकवाड, सविता गायकवाड, आदी उपस्थित होते.