Breaking News

नाराज भाजप खासदाराचा चौकादाराकडे राजीनामा!


लखनऊः उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्याचे भाजप खासदार अंशुल वर्मा यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यासाठी ते बुधवारी सकाळी थेट लखनऊ येथील भाजपच्या प्रदेश मुख्यालयात पोहोचले आणि तिथल्या चौकीदाराकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. तसेच समाजवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेशही केला.

भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अंशुल म्हणाले, की माझ्या मतदारसंघात मी विकास केला आहे. यापुढेही विकासालाच माझे प्राधान्य राहील. मी यापूर्वी अंशुल होतो, अंशुल आहे आणि अंशुलच राहणार. स्वतःला चौकीदार म्हणवून घेणार नाही.

राजीनामा देण्याचे कारण सांगताना अंशुल म्हणाले, की जर विकास हाच तिकीट देण्यासाठी निकष होता, तर मतदारसंघात 24 हजार कोटी रुपयांची कामे करीत शेवटच्या पायरीवर असलेल्या विकासाला चौथ्या पायरीवर आणल्याची शिक्षा मला मिळाली आहे. लोकसभेतही माझी हजेरी 95 टक्के होती; मात्र तरीही माझ्याकडून काय चूक झाली मला कळू शकलेले नाही.