Breaking News

शौर्य कुणाचे आणि छाती कोण काढतेय? शरद पवार यांची मोदी यांच्यावर टीका; जवानांच्या शौर्याचे राजकारण


नाशिक / प्रतिनिधीः
कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. देशावर हल्ला झाला त्यावरून राजकारण करणार नाही. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सुदैवाने पंतप्रधानांनी लष्कराला मोकळीक दिली, याबद्दल पवार यांनी कौतुक केले. जवानांनी ‘एअर स्ट्राईक’ करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली; मात्र सरकार याचा राजकीय फायदा घेत आहे. भाजप नेत्यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवावा, असा सल्ला पवार यांनी दिला.

शौर्य कोणी दाखवले, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतेय, असे म्हणत पवार यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा दुरूपयोग होत असल्याचे सांगताना पवार यांनी मध्य प्रदेशात एका ठिकाणी ईव्हीएम मशीनची तपासणी केली, तर कोणतेही बटन दाबल्यावर कमळाला मत जात होते, असे सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात तर 700 मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
मोदी यांनी जपून बोलले पाहिजे, असा सल्ला देऊन पवार म्हणाले, की पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी योगदान दिले आहे. अशा लोकांबद्दल बोलणे योग्य नाही असेही पवार यांनी सांगितले. देशाचा मूड बदलला आहे, हे मोदी यांना समजले. त्यामुळे त्यांनी हवाई हल्ल्याचे आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचेही राजकारण करण्यास सुरुवात केली, अशी टीका पवार यांनी केली. डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपने गमावली. यानंतर जनता आपल्याला नाकारणार, याची कुठेतरी या सरकारला खात्री पटू लागली. त्यानंतर आता जवानांच्या शौर्याचेही राजकारण केले जाते.


हल्ल्याचे राजकारण दुर्दैवी

14 फेब्रुवारीला जेव्हा पुलवामात ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर बारा दिवसांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला करून देशाने त्यांना उत्तर दिले; मात्र या सगळ्याचे राजकारण होते, आहे ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका पवार यांनी केला.