Breaking News

वैज्ञानिकांचे कर्तृत्व त्यांनाच सांगू द्या : राज ठाकरेंचा मोदींना टोला


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भारतीय वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राचा मारा करुन अंतराळातील एक उपग्रह पाडला. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे कार्य करणारा भारत चौथा देश ठरला आहे. यासंदर्भात मोदींनी बुधवारी दुपारी सर्व माध्यमांसमोर येऊन माहिती दिली. परंतु, ही माहिती मोदींनीच का दिली? वैज्ञानिकांचे कर्तृत्व त्यांनाच सांगू द्या, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पत्र जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी भारतीय वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. यासोबतच नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकाचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या. त्यांना प्रसिद्धी मिळू द्या. भारताने अंतराळ क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भूपृष्ठापासून 300 किमीवर अंतराळात भारतीय शास्त्रज्ञांनी अँटिसॅटेलाईट मिसाईलद्वारे एक ङएज लाईव्ह सॅटेलाईट उध्वस्त केले आहे. प्रत्येक भारतीयासाठी यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट असून शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.